खुप जणांना पुस्तक वाचायला आवडतात मला मात्र ते कधीच जमल नाही.मला आवडत लोकांचे चेहरे वाचायला,त्यांच्या स्वभावाचे पैलु समजुन घ्यायला.शिक्षणाच्या निमित्ताने घर सोडुन बराच काळ मी एकटी राहिले बहुतेक परिस्थिती बरोबर माझा हा छंद वाढत गेला.
प्रत्येकाचा चेहरा बोलका असतो इतका की आपण शांत असलो तरी आपल्याही नकळत तो मनातील सगळ सांगुन जातो.भावना त्याच असतात पण प्रत्येकाचा चेहरा ते वेग-वेगळ्या पद्धतीने सांगतो.कोणाचे शब्द वाक्यांच्या वाटेला जातच नाहीत तर कोणी वाक्यामध्ये शब्दांची बरसात करतो.सौम्य भाषा,मधुर आवाज कानाला सुखावतो तर कोणी नुसतेच शब्दांची फेकाफेक करतो.
फक्त चेहरा,वाणी,हावभाव नाही पण चालण्याची लकब,हसण्याची सहजता,मनाचे कोड़े,बुद्धीची चमक आणि बरच काही..केवढे हे प्रकार आहेत ज्याने आपण एकमेकांन पेक्षा वेगळे दिसतो,बनतो आणि जीवन जगतो.....
एकदा प्रवास करताना असच एक वेगळा चेहरा दिसला. बोलता बोलता एका अशिक्षीत आजींची कथा त्यांच्याकड़ुनच ऐकली.या आजींनी भगवद गीतेची अनेक पारायणे केली होती.त्या सांगत होत्या काहीही वाचता येत नसतानाही त्या आधी नुसत्याच गीतेतील ओळी वर बोट फिरावायच्या.काही दिवसानंतर त्यांनी उच्चार एकून त्याची आणि शब्दांची सांगड़ घातली आणि संस्कृत मधील गीता वाचायला सुरुवात केली
काही लोक आपले जीवन समाज कार्यासाठी वाहुन घेतात.अशी अनेक नावे आपल्याला माहीत आहेत वृत्त वाहिन्या आथवा वृत्तपत्र अश्या अनेक लोकांचे कार्य गौरान्वित करत असतात.त्याच्या पलिकडे अजुन अनेक हीरे या समाजात आहेत.
संकटांचे ओझे पाठीवर असताना देखिल खदाखदा हसणारे लोक मी पाहिले आहेत.इथे वर्षभर राबुन पगारामध्ये मनासारखी वाढ नाही झाली तरी आपली चिडचिड होते, तिथे मोजक्या पैशात जगभरच सुख मनात साठवताना मी लोकांना पहिले आहे.माझ्या मेसच्या काकू मला सांगायच्या ताटात काय वाढले आहे त्याहून जास्त ते मी किती समाधानाने खाते यात सुख दडल आहे.
काही लोक असतात नर्मदे मधील गुळगुलीत दगडा सारखे वयाचे कितीही पाणी वाहुन गेले तरी तसेच गोल मटोल.आयुष्याला मजा-मा जगणारे बिनधास्त!
चांगल्या स्वभाव विषेशाने व्यक्तीची बनते एक 'वल्ली'! माझ्यामते जीवन कसे जगायाचे याचे दोन मार्ग आहेत पहिला क्षणांचे धागे आपल्याच भोवती घेरा धरत एक व्यक्ति म्हणून जगायाचे आणि दुसरा वल्ली म्हणून लोकांच्या स्मृतीमध्ये एक अविस्मरणीय व्यक्ती म्हणून हसायचे !
Tuesday, April 13, 2010
Saturday, April 3, 2010
मनुकली
चान्दोमामाची चंदेरी दुनिया ,
पहुड़ते स्वप्नांची नाव त्यात ,
गोबरया गालांच्या माझ्या मनुकलीची,
काही वेगळीच आहे बात!
पहुड़ते स्वप्नांची नाव त्यात ,
गोबरया गालांच्या माझ्या मनुकलीची,
काही वेगळीच आहे बात!
गोंडस, निरागस, बडबडी, चतुर अशी माझी लाडकी परी-अनुष्का- 'मनुकली'.गेला आठवडा माझा तिच्याबरोबर अगदी मजेत गेला। इतर वेळी होणारी धावपळ, कामाची कटकट, बॉसचे घरीसुद्धा त्रास देणारे फ़ोन या सगळ्या जगापासुन तीच निरागस आयुष्य खुप वेगळ आहे...
तिच्या बोलक्या डोळ्यात पाहिल की राग कसा गायब होतो.गोष्टी सांगताना सगळे गोष्टितले भाव तिच्या चेहऱ्यावर उमटत असतात.भातुकलीचा खेळ खेळताना बहुलीला सजवताना ही आमुची बाहुली मग्न होउन जाते.सहल,तिचा मित्र परिवार,आई-बाबा यांच्या विषयी बोलताना ती भाव-विश्वात रंगुन जाते.कितीही दिवस बाहेर असली तरी आईला रोज एक ओळ पत्र लिहिते,खाऊ दिला की एक भाग बाबांसाठी राखून ठेवते,लहान लहान गोष्टींमध्ये खुश असते स्वारी!
'लहानपण देगा देवा' असा तिच्याकडे बघुन म्हणावस वाटत...लहान गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा गुण, आपल्या माणसाला सतत खुश ठेवणे असो किंवा जिद्दीने एखादी कला आत्मसाथ करणे.या चिमुकलीकडुन मी बरच काही शिकले..अगदी वय कमी नाही झाल तरी चालेल पण ते सगळे चांगले गुण मला दे रे बाप्पा!
Subscribe to:
Posts (Atom)