खरच असे असते का प्रश्न विचारण्या आधीच उत्तर मिळते का,
हसू ओठातून ओसंडून वाहते, नात्यांची व्याख्या बदलून जाते,
खरच असे असते का...
रुसून दूर निघून जातो, भांडतो तरी मनाचा एक हिस्सा रिकामा त्या
नात्या साठीच असतो, सुखाचे धागे दोरे नकळत जुळत जातात अजून दृढ बनवत,
आठवणीच्या गावामध्ये मनापासून वाट बघत,
खरच असे असते का...
दिवस
किती वर्षे याची या नात्याला काही पर्वा नसते, मनाला मन ओळखून असते, एवढे
मनापासून आपले कोणी चांगले चिंतन करणारे, हक्काने आपल्या जीवनात रंग उधळत
जाणारे,
खरच असे असते का..
सारे जग विसरून गेले तरी आपल्याला न विसरणारे , देवासारखे जाणते-अजाणते पाठीशी कोणी असते, खरच खरच हे असेच असतेच ना, मैत्री ज्याला म्हणतात त्याची कदाचित हीच व्याख्या असते ना..
आयुष्य पण काय सही कथा रंगवत असते. आपण कल्पनाही नाही करणार असे प्रसंग आपल्या बरोबर घडत असतात आणि आपण विचार करण्या आधीच सारे घडून जाते. काही लोक उगीचच आवडत नाहीत आणि काही लोक असे काही मनात घर करतात कि आयुष्य लिहिणाऱ्याला त्या देवाला "क्या बात!" म्हणावेसे वाटते. माझ्या आयुष्याच्या प्रवासासाठी देवाने खूप छान सह-प्रवासी निवडलेले आहेत. प्रसंगातून सुरुवात आणि सुरुवातीपासूनच मनाला भावणारे असे माझे विशेष सव-प्रवासी! "अनोमोल नाती" याच्या आधीच्या भागात मी असेच काही लिहिले होते. तसे सगळेच सहप्रवाशी विशेष आहेत पण हा भाग खास लिहीतीय ते मनाने खूपच जवळच्या आणि मैत्रीच्या नात्याला माझ्या आयुष्यात एक धमाल मस्ती घेऊन आलेल्या मैत्रिणीसाठी.
माझी नाती जपण्याची परिभाषा खूप वेगळी आहे. मी हक्काने केह्वाही लोकांना
call करते आणि कधी वर्षानु-वर्षे दोन ओळींचे पत्रही लिहित नाही. माझा असा
स्वभाव असूनही फ़क़्त माझ्यातील चांगले काय ते लक्षात ठेवून मला मनापासून
प्रेम करनार्या, प्रसंगी मला फोन करून मनसोक्त स्तुती-सुमने उधळून चीड-चीड
करणाऱ्या पण मग तेवढ्याच काळजीने , आपुलकीने विचारपूस करणाऱ्या मैत्रिणींना
मी देवाचे आशीर्वाद मानते.
२-३ वर्ष एकाच कंपनीमध्ये काम केल्यामुळे म्हणा किंवा काम काही विशेष नसल्यामुळे, मला इतर लोकांसारखा कंपनी विषयी खास असा काही राग नसे. मस्त मनाला हवे तेव्हा यायचे आणि मस्त गप्पा मारून घरी निघून जायचे. खरच मस्त आळशी दिवस चालू होते. देवाला देखील तेह्वा विशेष काम नसावे त्याने एका नवीन व्यक्तीची प्रवेशिका इथेच लिहिली. आमच्या cubical मध्ये एक नवीन मुलगी आली. स्वत:हून कशाला बोला "ती" नवीन आली आहे चुकून बोलत बोलत नको तो जोक मारला तर पळून जाईल इकडून म्हणून मी आपले तिला बघून न-बघितल्या सारखे केले. पण काय सांगू हि तर माझ्याहून जास्त बड-बडी निघाली..एवढी कि मी प्रसंगी शांत बसायचे. मला तिची हि गोष्ट आवडली आणि आमची मैत्री जुळली. जवळची मैत्रीण असणे किती गरजेचे असते हि एक "खास" मैत्रीण असणारी व्यक्तीच सांगू शकते. ड्रेस किती छान आहे पासून ते "अग अमुक-अमुक झाले आणि मग तमुक झाले" असे गोस्सीप करणे म्हणजे किती मजा असते म्हणून सांगू.
गप्पा, गोष्टी, किस्से, आठवणी ,तुझा बॉस , माझा बॉस , म्हनून सुरुवात झालेली हि हलकी-फुलकी मैत्री रोजच्या दिनचर्ये मध्ये आपसूकच सामावून गेली होती. घरी कांदा पोह्याचे कार्यक्रम सुरु झाले आणि मग आमच्या गप्पांच्या यादीत एक महत्वाचा विषय जोडला गेला. या विषयावर बोलताना समजले कि अरे हि मुलगी जेवढी स्पष्टवक्ती आहे तेवढेच आयुष्यात तिला काय करायचे आहे हे हि ती तितक्याच ठाम पणे मांडू शकते. प्रसंगी तिच्यातील भाबडेपणा तिच्यातील छोट्या मुलीची आठवण करून द्यायचा. जीवनाविषयी तिची काय विचार सारणी आहे हे जस जसे मला समजत गेले तसतसा माझ्या मनातील तिच्या विषयीचा आदर वाढत गेला.
मला नव्याने मैत्रीची जाणीव करून देणारी ऑफिस मध्येच काय पण माझ्या घरी पण लाडकी झालेली मैत्रीण आता सौ. बनणार हे एकूण काय धमाल वाटली! मनाचा पण जरा एक प्रोब्लेम असतो एकाच क्षणात मन हजार गोष्टींचा विचार करते. लग्नाची बातमी एकून एक पापणी आनंदाने ओली झाली तर दुसरी काहीतरी जवळचे खूप लांब चालले आहे याने पाणावली.खरतर आज जग छोटे झाले आहे . e-mail, फोन अश्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी संपर्क साधू शकता पण मला तर हे क्षणिक वाटते ..मी काही कारणांमुळे या खास मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. फक्त तिला १० वेळा फोन करून शुभेच्छा देणे हातात होते..पण तिच्या आयुष्यातील त्या खास दिवशी खुलून आलेली सहज लाजणारी गुलाबी छटा, तिच्या चि.सौ.का. चे सौ. बनतानाचे अनेक आशांनी, स्वप्नांनी चमकणारे डोळे, तिच्या स्वप्नातील राज-कुमारासाठी तिने घेतलेला पहिला उखाणा, संस्कारांची शिदोरी मनात साठवून जड पावलांनी माहेरचा घेतलेला निरोप सारे काही शब्दात बांधता येईल का? मैत्री किंवा कोणतेच नाते शब्दांच्या पलीकडील असते. आता ती परदेशी निघून जाईल तेह्वा तिच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग मला फोटो मधून समजातील, त्याचे वर्णन फोने वरून समजेल..पण मी तिला नक्कीच miss करेन.
तिने आयुष्यात खूप प्रगती करावी आणि तिने तिच्या संसारासाठी पाहिलेली स्वप्ने साकार व्हावी , सुखांचा गुणाकार आणि दुखांचा भागाकार करत नव्या दिवसांना तिने भेटावे हीच सदिच्छा..