Sunday, December 30, 2012

अनमोल नाती-भाग ३

खरच असे असते का प्रश्न विचारण्या  आधीच उत्तर मिळते का, 
हसू ओठातून ओसंडून वाहते, नात्यांची व्याख्या बदलून जाते, 
खरच असे  असते का...
रुसून दूर निघून जातो, भांडतो तरी मनाचा एक हिस्सा रिकामा त्या नात्या साठीच असतो, सुखाचे धागे दोरे नकळत जुळत जातात अजून दृढ बनवत, 
आठवणीच्या गावामध्ये मनापासून वाट  बघत, 
खरच असे असते का...
दिवस किती वर्षे याची या नात्याला काही पर्वा नसते, मनाला मन ओळखून असते, एवढे मनापासून आपले कोणी चांगले चिंतन करणारे, हक्काने आपल्या जीवनात रंग उधळत जाणारे,
 खरच असे असते का..
 सारे जग विसरून गेले तरी आपल्याला न विसरणारे , देवासारखे जाणते-अजाणते पाठीशी कोणी असते, खरच खरच हे असेच असतेच ना, मैत्री ज्याला म्हणतात त्याची कदाचित हीच व्याख्या असते ना..

आयुष्य पण काय सही कथा रंगवत असते. आपण कल्पनाही नाही करणार असे प्रसंग आपल्या बरोबर घडत असतात आणि आपण विचार करण्या आधीच सारे घडून जाते. काही लोक उगीचच आवडत नाहीत आणि काही लोक असे काही मनात घर करतात कि आयुष्य लिहिणाऱ्याला त्या देवाला "क्या बात!" म्हणावेसे वाटते. माझ्या आयुष्याच्या प्रवासासाठी देवाने खूप छान  सह-प्रवासी निवडलेले आहेत. प्रसंगातून सुरुवात आणि सुरुवातीपासूनच मनाला भावणारे असे माझे विशेष सव-प्रवासी! "अनोमोल नाती" याच्या आधीच्या भागात मी असेच काही लिहिले होते. तसे सगळेच सहप्रवाशी विशेष आहेत पण हा भाग खास लिहीतीय ते मनाने खूपच जवळच्या आणि मैत्रीच्या नात्याला माझ्या आयुष्यात एक धमाल मस्ती घेऊन आलेल्या मैत्रिणीसाठी.
 माझी नाती जपण्याची परिभाषा खूप वेगळी आहे. मी हक्काने केह्वाही लोकांना call  करते आणि कधी वर्षानु-वर्षे दोन ओळींचे पत्रही लिहित नाही. माझा असा स्वभाव असूनही फ़क़्त माझ्यातील चांगले काय ते लक्षात ठेवून मला मनापासून प्रेम करनार्या, प्रसंगी मला फोन करून मनसोक्त स्तुती-सुमने उधळून चीड-चीड करणाऱ्या पण मग तेवढ्याच काळजीने , आपुलकीने विचारपूस करणाऱ्या मैत्रिणींना मी देवाचे आशीर्वाद मानते.
२-३ वर्ष एकाच कंपनीमध्ये  काम केल्यामुळे म्हणा किंवा काम काही विशेष नसल्यामुळे, मला इतर लोकांसारखा कंपनी विषयी खास असा काही राग नसे. मस्त मनाला हवे तेव्हा यायचे आणि मस्त गप्पा मारून घरी निघून जायचे. खरच मस्त आळशी दिवस चालू होते. देवाला देखील तेह्वा विशेष काम नसावे त्याने एका नवीन व्यक्तीची प्रवेशिका इथेच लिहिली. आमच्या cubical मध्ये एक नवीन मुलगी आली. स्वत:हून कशाला बोला "ती" नवीन आली आहे चुकून बोलत बोलत नको तो जोक मारला तर पळून जाईल इकडून म्हणून मी आपले तिला बघून न-बघितल्या सारखे केले. पण काय सांगू हि तर माझ्याहून जास्त बड-बडी निघाली..एवढी कि मी प्रसंगी शांत बसायचे. मला तिची हि गोष्ट आवडली आणि आमची मैत्री जुळली. जवळची मैत्रीण असणे किती गरजेचे असते हि एक "खास" मैत्रीण असणारी व्यक्तीच सांगू शकते. ड्रेस किती छान आहे पासून ते "अग अमुक-अमुक झाले आणि मग तमुक झाले" असे गोस्सीप करणे म्हणजे किती मजा  असते म्हणून सांगू. 
गप्पा, गोष्टी, किस्से, आठवणी ,तुझा बॉस , माझा बॉस , म्हनून सुरुवात झालेली हि हलकी-फुलकी मैत्री रोजच्या दिनचर्ये मध्ये आपसूकच सामावून गेली होती. घरी कांदा पोह्याचे कार्यक्रम सुरु झाले आणि मग आमच्या गप्पांच्या यादीत एक महत्वाचा विषय जोडला गेला. या विषयावर बोलताना समजले कि अरे हि मुलगी जेवढी स्पष्टवक्ती आहे तेवढेच आयुष्यात तिला काय करायचे आहे  हे हि ती तितक्याच ठाम पणे  मांडू शकते.  प्रसंगी तिच्यातील भाबडेपणा तिच्यातील छोट्या मुलीची आठवण करून द्यायचा. जीवनाविषयी तिची काय विचार सारणी आहे हे जस जसे मला समजत गेले तसतसा माझ्या मनातील तिच्या विषयीचा आदर वाढत गेला.
 मला नव्याने मैत्रीची जाणीव करून देणारी ऑफिस  मध्येच काय पण  माझ्या घरी पण लाडकी  झालेली मैत्रीण आता सौ. बनणार हे एकूण काय धमाल वाटली! मनाचा पण जरा  एक प्रोब्लेम असतो एकाच क्षणात मन हजार गोष्टींचा विचार करते. लग्नाची बातमी एकून एक पापणी आनंदाने ओली  झाली तर दुसरी काहीतरी जवळचे खूप लांब चालले आहे याने पाणावली.खरतर आज जग छोटे झाले आहे . e-mail, फोन अश्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी संपर्क साधू शकता पण मला तर हे क्षणिक वाटते ..मी काही कारणांमुळे या खास मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. फक्त तिला १० वेळा फोन करून शुभेच्छा देणे  हातात होते..पण तिच्या आयुष्यातील त्या खास दिवशी खुलून आलेली सहज लाजणारी गुलाबी छटा, तिच्या चि.सौ.का. चे सौ. बनतानाचे अनेक आशांनी, स्वप्नांनी चमकणारे डोळे, तिच्या स्वप्नातील राज-कुमारासाठी तिने घेतलेला पहिला उखाणा, संस्कारांची शिदोरी मनात साठवून जड पावलांनी माहेरचा घेतलेला निरोप सारे काही शब्दात बांधता येईल का? मैत्री किंवा कोणतेच नाते शब्दांच्या पलीकडील असते. आता ती परदेशी निघून जाईल  तेह्वा तिच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग मला फोटो मधून समजातील, त्याचे वर्णन फोने वरून समजेल..पण मी तिला नक्कीच miss करेन.
तिने आयुष्यात खूप प्रगती करावी आणि तिने तिच्या संसारासाठी पाहिलेली स्वप्ने साकार व्हावी , सुखांचा गुणाकार आणि दुखांचा भागाकार करत नव्या दिवसांना तिने भेटावे हीच सदिच्छा..


Sunday, October 7, 2012

कवितेतील पाऊस-पावसाची कविता

'पाऊस' हा बहुतेक लोकांचा आवडता विषय आहे. हा विषय निघाला कि लोकांकडे बोलण्यासारखा एक तरी अनुभव असतोच..बरसणाऱ्या सरींना पहिले कि चारोळी सुचते, गाणी सुचतात असे सुंदर अनुभव आहेत. तर नुसते ढग गडगडले तरी आज पावसाने काम गडबडणार असे वाटणारे दिवसही आहेत. तेच थेंब, तोच गारवा, तीच हिरवे पाने, धावणारा वारा पण त्यातून मिळणारा अनुभव वेगळा.अश्याच वेग-वेगळ्या आशयाच्या  दोन कविता इथे मांडत आहे.तुम्हाला कवितेतील पाऊस जवळचा वाटला कि पावसावरील कविता नक्की सांगा!

कवितेतील पाऊस


ऐटीत आला आला ,गजरात हजार ढगांच्या,
राजा ऋतूंचा डौलात चालला ,धरणीला भेटायला...

थेंब थेंब बरसतो,जणू झंकार मनीचा,
वीज काढी  खोडी, निळ्या प्रीतीचा ओलावा...
 
कळी उमलते  दारी जुई नाजूक लाजणारी,
धरणी आतुरतेने बघते सारे,मृदगंध दरवळतो सुखाचा...

नेसून हिरवा शालू अवनी पालवी-पालवीतून हसली,
रंग उधळत फुलांचे,रान-वनात मोहरून गेली ..

धरणी झाली समृद्ध,रम्य हा निसर्ग सोहळा,
ऋतूराजा गेला सृष्टीत सामावून,पुन्हा नव्याने धरणीला भेटायला....



पावसाची कविता

आला आला वारा  संगे पावसाच्या धारा,
 छत्री उघडा सारे घरी लवकर चला..लवकर पळा ..

तेज नजर ठेवा वाढेल ट्राफिक चा पसारा,
पाणी सारीदूर चाकातून उडतो फवारा..चुकवा फवारा 

नका पाहुत रोखून नाही थांबणार रिक्षेवाला,
मनी नाम घेत देवाचे बसमागे धावा..सामान वाचवा 
 
नको नको म्हणताना रेनकोटने दगा दिला,
 कापडी जगाला लाभला ओलावा..गारवा गारवा 

बंद पडेल दुचाकी  वेग वाढवावा जरा..
विसरा खड्ड्यांना मागच्याने जीव सांभाळा..तोल सांभाळा 

गेला गेला पाऊस सारे भिजवून गेला,
कांदा-भजीची ओढ लागते मनाला..ओढ मनाला


.

 


Friday, June 22, 2012

लग्नाच्या अलीकडे-पलीकडे

आज कोणीतरी 'तुझे लग्न कसे ठरले?' असा प्रश्न विचारला आणि मी उत्तर देता देता जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. दिवस किती भराभर धावतात.कधी असे दिवस होते कि मी जेव्हा माझा होणारा नवरा कसा असेल याची स्वप्न पहात होते आणि आज आमच्या लग्नाला बघता  बघता 6 महिने पूर्ण पण झाले.

लाग्नाआधीचे दिवस म्हणजे स्वप्नांची दुनिया असते। ती इतकी मोहक असते कि आपण जसा विचार करू तसेच जग आपल्याभोवती फिरेल असे नेहमी वाटत राहते।mobile- हिंदी गाणी जवळ वाटायला लागतात, घरी greeting कार्ड आणि फुलांचे येणे जाणे सुरु होते.कधी बोलताना विचार केलाही नसेल पण आता भावनांना व्यक्त करताना शब्दांमध्ये बांधणे अवघड होऊन जाते। मस्त फिल्मी वाटते पण तरीही आपले खास नाते सगळ्यांपेक्षा वेगळे आहे असेही मनाने ठरवून टाकलेले असते ।आपण कोणासाठीतरी खास आहोत या विचारानेच मन भारावून जाते। कदाचित सगळ्यांबरोबर काहीसे असेच होते...... 

प्रेमासाठी जगताना जगण्याची 
परिभाषा बदलून जाते,
नव्याने आपल्याला  नकळत,
आपली ओळख होते..

आपलेसे भेटते कोणीतरी जेव्हा
 नियमांचे गणित चुकते,
अवघडही  होऊन जाते सोप्पे 
 विचारांची दिशा बदलते..

कवी कल्पनांचे विश्व सारे,
हळू-हळू आपलेसे होऊन जाते,
 चांदण्या-दवबिंदू-रंग फुलांचे,
अजूनच मोहक रूप घेते...

किती सांगावे किती बोलावे,
भान अनेकदा हरपून जाते,
प्रेमात पडल्यावर कळते,
जीवन किती सुंदर असते.

जस-जशी लग्नाची तारीख जवळ येते तशी मनाला नव्या नात्यांची ओढ लागते. इतके दिवस पाहिलेल्या स्वप्नांना साकारताना काही वेगळेच सुख मिळते. लग्नाची धावपळ संपते आणि आई-बाबांना निरोप देताना मन गोंधळून जाते.सगळे आपल्याला आधीपासून माहित असते पण तरीही काही प्रश्नांची उगीच मनात लुडबुड सुरु होते। काही दिवसांनी मनाची गाडी रुळावर येते।लग्नाआधीच्या जादूमयी दुनियेमध्ये आता कुकरची शिट्टी वाजते, सामानाची यादी असते,पाहुण्यांची ये-जा असते. जादूमयी दुनियेतील राजकुमारी आता कोणाची सून असते, कोणाची वहिनी असते. लग्नाआधी ताई म्हणून हाक मारणारी चिमुकली मंडळी आता काकू म्हणून हाक मारतात. घरी पोळीचे नकाशे बाबा वाह! म्हणत खात असतात पण तोच भूगोल लग्नानंतर गोल करावाच लागतो।  लग्नाची हीच मजा आहे. आपण असेही वागू शकतो याचे  मलाच कधी कधी आश्चर्य वाटते।
लग्नाआधी मनाला जाणणारा मित्र आणि लग्नानंतर मनापासून प्रेम करणारा जीवन-सहप्रवासी म्हणून हातात हात घेणार्या नवर्याशी मैत्री अजून धृढ होते .नवरा-बायको मधील भांडणांची मजा काही औरच असते :).
 सुख कशाला म्हणायचे आणि समाधानाची वाख्या आपल्याच हातामध्ये असते हे लग्नानंतर अनुभवातून कळते। लग्नाआधीचे आणि नंतरचे प्रेम तेच असते पण एकमेकांना जाणून घेताना ते अजून परीक्व होत जाते.
 
मंगल समयी सनई चौघडे,
सौभाग्याचे क्षण घेऊन आले 
अक्षदांच्या कणा-कणातुन,
शुभ आशीर्वाद लाभले 

पदरात लपवून माहेरचा ओलावा,
नव्या दिशांकडे चालली पाऊले
ओलांडले माप उंबरठ्यावरील,
नवीन नात्यांशी नाते जुळले 

नवीन जगात हरवल्यावर,
संस्कारांची गुरुकिल्ली कामी येते,
' प्रेमाने जग जिंकता येते ',
आईची शिकवण अनुभवातून पटते..


संसाराची न वाख्या असते,
कदाचित शब्दांच्या पलीकडे काही असते,
तुझे माझे म्हणता म्हणता,
आपलेसे जग होऊन जाते..

 लग्नाच्या 6 महिन्यान नंतर लिहिलेला हा blog काही अनुभवांनी सम्पूर्ण नसेलही..पण कदाचित लग्नाचे असेच असते।.वेगळे वेगळे म्हंटले तरी तुमचे माझे same  असते :)


Saturday, May 19, 2012

वाऱ्यावरील सफर


Mauritius ला जाताना मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती- आकाशामध्ये उडण्याची-Sky diving ची !  आज-उद्या  म्हणत म्हणत तो दिवस उगवला ज्याची मी इतके दिवस स्वप्ने पहिली होती.Sky diving च्या office मध्ये पोहचेपर्यंत मनात हजार विचार येऊन गेले. एकिकडे आकाशात उंच उडायची उत्सुकता होती तर दुसरीकडे १०,००० फूट म्हणजे किती मजली उंच इमारत याची कल्पना मनाला दोन पाऊले मागे जायला सांगत होती! या सगळ्या विचारांच्या गर्दीमध्ये आम्ही office मध्ये कधी येऊन  पोहचलो हे कळलेच नाही.
skydiving करायच्या आधी काही forms भरून घेतले जातात. 'तुम्ही आकाशातून उडी मारायचं शहाणपण करताय पण यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकतो याचे तुम्हास भान आहे. तुम्हाला काही झाल्यास मंडळ जवाबदारी घेणार नाही. स्वत:ची जवाबदारी घेण्या इतपत तुम्ही सज्ञान आहात. धन्यवाद!'  याच अर्थाचे इंग्रजी भाषेमधील दोन-तीन उतारे वाचले आणि संमती देत form वर सही केली. सही करताना मी आणि अपूर्वने एकाच वेळी एकमेकांकडे पहिले आणि एक हसू गालावर उमटले. ते हसू आणि त्यामागील विचार कदाचित शब्दामध्ये बांधता येणार नाहीत...
 form भरून झाल्यावर आम्हाला आमच्या प्रशिक्षकांची ओळख करून देण्यात आली. .आम्हाला वाटले कि चांगले ३०-३५ मिनिटे प्रशिक्षण चालेल पण इथे तर २-३ मिनिटांमध्येच सगळे आटोपले. आम्हाला jumping suit चढवण्यात आले आणि पुढे काय काय घडणार आहे यादिशेने मन धावायला लागले..एक छोटेसे विमान आमची वाट बघत होते.आम्ही विमानात बसलो. दारातून भरदाव एकू येणाऱ्या वार्याची गती आणि माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती एकाच लयात चालत असावी..
विमानाच्या खिडकीमधून खाली डोकावून पहिले आणि वाह! याशिवाय काही शब्द सापडले नाहीत. किती सुंदर दृश्य होते ते..समुद्र असा दूरवर पसरला होता तो निळ्या रंगाच्या अनेक छटा घेऊन..मोराने आनदाने नाचत पिसारा फुलवावा आणि निळ्या, हिरव्या ,सोनेरी रंगाची उधळण करावी तसेच काहीसे रंग इथे दिसत होते..अनेक रंग लाटांवर घेत समुद्र येतो आणि सारे रंग धरणीवर मनसोक्त उधळतो..रुपेरी वाळूतून पुन्हा परत जातो आणि अजून निळाशार होत क्षितिजापाशी आकाशाला जणू भिडतो..समुद्र किनारा देखील किती मोहक आकारामध्ये दूरवर पसरला होता..असे वाटत होते कोणीतरी खूप मनापासून रुपेरी वाळूवर मुक्त रेघा कोरल्या आहेत.. जमिनीला हिरव्यागार शेतांनी झाकून टाकले होते..नागमोडी करड्या, काळ्या रंगाचे रस्ते वाट काढीत होते..दुसर्या बाजूला रिकाम्या मैदानावर सुंदर घरांची वस्ती उठून दिसत होती..नजर जिकडे फिरवावी तिकडे रंग, आकार, आवाज आणि कल्पनेच्या बाहेर मनाला मोहून टाकणारी दुनिया होती..मी यात स्वत:ला विसरून गेले होते 
विमान थोड्या अजून उंचीवर गेले आणि खालील सारे दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे दिसायला लागले. मी माझ्या instructor बरोबर चर्चा केली तर समजले कि आम्ही फ़क़्त १००० फूट वर पोहोचलेलो आहोत..मनातील भीती एव्हाना गायब झाली होती आणि उंची वाढेल तशी हे सुंदर चित्र कसे अप्रतिम होत जाईल याची उत्सुकता वाढत होती..बघता बघता आम्ही ढगांच्याही वर आलो.जमिनीवरून गुबगुबीत दिसणारे आणि सूर्याबरोबर लपछपी करणारे हे ढग जवळून तेवढेच लोभस दिसत होते.असे वाटत होते कि काश या ढगांवरून मस्त सैर करता आली असती. ढगांची कधी चपळ तर कधी संथ हालचाल जमिनीवर आपल्या सावलीबरोबर जणू खेळ खेळत होती.ते बदलणारे दृश्य माझ्या मनाचे वय अजून लहान करत होते आणि त्याच्या मागे धावत होते.
 
काही वेळाने बंद केलेले विमानाचे दार पुन्हा उघडण्यात आले. आमच्या instructor ने सांगितले कि आता आपण उडी मारायची आहे सगळ्या सूचना लक्षात ठेवा.हे एकून मनामध्ये काय सूचना सांगितल्या होत्या याची checklist चालू झाली.अजून मी शेवटच्या check point पर्यंत पोहचातीय तो पर्यंत मी विमानाच्या दारात होते आणखीन काही विचार करायच्या आधी हवेमध्ये पोहोचले होते. काही सेकंद समजलेच नाही कि हे काय घडतंय. ताशी २०० km च्या वेगाने आम्ही जमिनेकडे झेप घेत होतो.सारे अवती भोवती गोल गोल फिरत होते, वेग आणि आवाज याशिवाय काहीच दिसत नव्हते, ओळखीचे वाटत नव्हते.काही क्षण वाटले झाले आता अश्या स्वत:भोवती प्रदिक्षिणा घालत आपण जमिनीमध्ये वेगाने आपला झेंडा गाढणार! पण अचानक गती कमी झाली आणि सारे काही शांत झाले.इतके शांत कि माझ्या हृदयातील ठोकेही मला एकू येत होते.काही क्षणपुर्वी वाटलेली भीती मनाचा पोरखेळ वाटत होता.जे दृश्य विमानात बसून पहिले त्याचा जणू काही मी हिस्सा बनतीय असे वाटू लागले. समुद्राचे रंग अजून मोहक होऊ लागले..रस्ते , नागमोडी वाट, हिरवीगार शेते, बसकी घरे, उंच इमारती सारे सारे काही आपलेसे वाटायला लागले.
  

पक्षी आकाशात उडतात तेह्वा त्यांना किती मजा येत असेल याची कल्पना या अनुउभावातून आली.. न कसले traffic न कसली धावपळ! आपल्या उंची पासून खूप उंचावरून जग पाहताना  जाणवते कि किती छोटे आहोत आपण. असे गंभीर विचार डोक्यात येत असतानाच पक्ष्याप्रमाणे आम्ही घिरट्या घेऊ लागलो. आमची वर्यावरील सफर अजून मजेशीर होत गेली ती parachute बरोबर केलेल्या खेळामुळे. ४-५ मिनिट आकाशात होते तेव्हा वाटले अजून थोडा वेळ म्हणत म्हणत इथेच दिवसाची संध्याकाळ होताना पहावी..अजून किती रंग, किती गोष्टी या आकाशापाशी आहेत याची जवळून ओळख करून घ्यावी. बघता बघता वेग कमी होत गेला आणि आम्ही जमिनीवर येऊन पोहोचलो ते आयुष्यभर मनात कायम राहतील अश्या आठवणींना घेऊन.