मस्त उसळणाऱ्या लाटा, सुंदर समुद्र किनारा, गार सुखद वारा आणि पायाखालून हळुवार सरकणारी वाळू..अश्या वातावरणामध्ये कोणाला मन चिंब भिजून जाईपर्यंत पाण्यात रहावेसे नाही वाटणार! पण आमची चिमुकली गार्गी तिला समुद्राचे पाणी बघून डोळ्यात पाणी दाटून येत होते..तिच्यासाठी प्रकाश पाण्याबाहेर राहून जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या साऱ्या सजीव, निर्जीव जीवांचे फोटो काढत होता..आम्हाला या सर्वाची जाणीव खूप उशिरा झाली.
आम्ही सारे मस्त पाण्यामध्ये खेळ खेळत होतो..लोक जास्तीत जास्त काय एक मेकांवर पाणी उडवतात, लाटांवर उड्या मारतात पण असे साधे खेळ खेळले तर आम्ही कसे..काही तरी बिलंदर करायलाच हवे! यावेळी स्नेहा चा उत्साह लाटांच्याहि पुढे धावत होता..आणि धावत धावत तो धपकन पाण्यात पडला..त्याच्या तळा -गाळाशी गेला आणि तिथून ओल्या मऊ वळूला घेऊन आला..आता हे असे वर्णन का? हो ना? काही नाही स्नेहाला हा खेळ सुचला कसा असेल याचा विचार करत होते आणि हे सगळे वाटले..हा तर स्नेहाने सुचवलेला खेळ असा होता कि हातामध्ये मावेल इतकी चिखल वाळू घ्यायची आणि नेम लागला तर नेम धरून नाहीतर अशीच समोरच्याचा अंगावर रंग उधळतो तशी फेकायची! बर तसं पाण्यात गेल्यावर आपण ओले होतो हे मला माहित होते..पण बुद्धी ओली होते आणि आपण असे खेळ हि मजेत खेळून जातो याबद्दल आता कोरडे छान राहून मला बोलायला खूप मजा वाटतीय..पण तेह्वा स्नेहा च्या कृपेने आम्ही वाळूमय होऊन गेलेलो होतो..
अनिकेत तसा शांतहि राहू शकतो या न पटणार्या सत्याशी सामोरे आम्ही इथेच गेलो..अनिकेत चा अगदीच खोया खोया चंद झाला होता आणि तो (बहुतेक) लाडक्या व्यक्तीच्या विचारांमध्ये सारे जग विसरून समुद्र किनारी निर्विकार पणे उभा होता.. सामाजिक कामे करण्याची त्याची तयारी मात्र कौतुक करण्यासारखी होती.. आम्ही बापडे पोहता येत नाही म्हणून चार पाऊले चालून पाण्यात जायचो..लाटेवर खेळायचो आणि मोठ्ठी लाट आली कि स्थलांतर! मग अनिकेत आला आणि त्याने एकेकाला अगदी लाट मनाला भिडे पर्यंत समुद्रात आत घेऊन गेला..तेह्वा जाणवले केवढी प्रचंड ताकद आहे या उसळणार्या लाटांमध्ये..लाट आमच्याकडे धाऊन यायची आणि मागे ढकलून द्यायची...परत समुद्राच्या कुशीत सामावताना पायाखालील वाळू आपल्याबरोबर घेऊन जायची..तेह्वा क्षणभर वाटायचे कि जणू कणा-कणाने आपण समुद्राकडे खेचले जातोय..नुसता किनार्यावरून फेसाळणारा समुद्र आपल्या आत किती काही दडवून असेल असे वाटून गेले!
वेदिकाने तसा पहिल्यांदा समुद्र किनारा पाहिला नव्हता पण स्वारी ख़ुशी होती..पाण्यात भिजत भिजत लाटेनेच आमची एकदा मजा केली..आमचा अंदाज चुकवत तिने समुद्रातून वर खाली असे छान बुडविले..सेकंदभरात लाट डोक्यावरून गेली आणि समुद्राचे पाणी किती खरे असते याची चव समजली..मग मात्र वेदिकाची किनार्यावर परतावणी झाली आणि ती गार्गी टीम मध्ये शामिल झाली..तिला सोडायला मी जेह्वा परत गेले तेह्वा मला प्रकाशचे काय चालले आहे हे दिसून आले..येणारी लाट, जाणारी लाट, पोहणारी वाळू, समुद्रात वाहत जाणारी वाळू, ओला शिंपला, कोरडा शिंपला, भांडणारी कुत्री, हसणारे आम्ही, समुद्रात लाल प्रकाशाचे किरण उधळत हसणारा सूर्य आणि आमच्या चपला सुद्धा! प्रकाशला हे सगळे काही कॅमेरा मध्ये सामावून घेण्याचा छंद जडला होता!
मग मी हि विचार केला आपण का मागे राहावे..मी पण कॅमेरा काढला आणि भन्नाट फोटो काढले..अरे हो यात सगळ्यात अमोल काय काय करत होता हे सांगितले नाही ना मी..त्याचा काय झाले अनिकेतचा तर झाला होता ओला खडू म्हणून अमोलहि सैर-भैर वार्याप्रमाणे आपली नजर फिरवत उभा होता..जिथे कमी तिथे आम्ही या तत्वाने तो मला आणि स्नेहाला शिंपले गोळा करायला मदत करत होता..
सगळे वाळूवर आपापली नावे कोरत असताना मी आपली वाळूचा किल्ला (डोंगर बहुतेक ) रचत होते..वेदिका आणि मी आमच्या पाऊल खुणांचे ठसे बघत किनार्यावर मुक्त धावत होतो..अमोल आणि स्नेहा मात्र काहीतरी गंभीर विषयावर बोलत होते..तेवढ्यात किनार्यावरून धावणारी बैलगाडी दिसली...काय सही वाटला आम्हाला..चला घोडागाडी नाही पण कमीत कमी बैलगाडी तरी दिसली !
इतका वेळ मनाशी बांधून ठेवलेला उत्साह आता मावळणार्या सूर्याबरोबर कमी होत होता..परत वाडीमधून मार्ग काढत जावे लागणार म्हणून समुद्राच्या त्या रंगे-बी-रंगी रुपाला डोळ्यात साठवून आम्ही आमच्या रूमवर परतलो..