Wednesday, August 3, 2011

क्षणभर विश्रांती भाग-२

रूम वर पोहोचलो आणि जणू प्रवासाचा थकवा कुठे पळून गेला..संथ गार वार्यावर  झुलणारा दरातील झोका पाहिला आणि पावलाने त्या निवांत क्षणांची वाट निवडली...रोजच्या धावत्या आयुष्यात कधी प्रवासाची कसरत तर कधी ऑफिसमधील कटकट! घड्याळाचे काटे पुढे पळत असतात आणि आपण त्याचे मागे धावत असतो...तासा-तासांनी दिवस संपून जातो आणि मन तरीही अजून काही नवे , सुखाचे क्षण शोधत असते...पण इथे आलो आणि या निवांत क्षणांमध्ये मन जणू विरघळून गेले..संथ पाण्यामध्ये कागदाची नाव कशी अलगद तरंगत असते तसे वाटले मन जणू या क्षणांवर आरामात पहुडले आहे..

 

आमच्या बरोबर आलेली बच्चे कंपनी तर जाम खुश होती..झोका , आंब्याची झाडे, केळीची हिरवीगार झाडे आणि  या झाडावरून त्या झाडावर दुडू दुडू पळणारी खारुताई..एक नजर या सगळ्याकडे पहावे आणि एक नजर या चिमुकल्यांच्या निरागस डोळ्यांमध्ये..किती तो आनंद , आश्चर्य इवल्याश्या डोळ्यांमध्ये तरळत होता! हसत गप्पा मारत आम्ही सारे त्या झोक्याच्या अवती भोवती थांबलेलो होतो..घरासमोर एक काळभोर रस्ता कधीतरी धावणाऱ्या वाहनांची वाट बघत होता..३०-35 मिनिटांनी एखादी गाडी भरदाव धावायची..हा रस्ता ओलांडला कि समोर आमच्या घर-मालकाचे घर होते..तिकडे आमची जेवायची सोय करण्यात आली होती..
झोक्यापाशी काहीवेळ रेंगाळल्यावर आम्ही सगळे जरा टवटवीत झालो..मस्त जेवलो आणि स्वस्थ एक वामकुक्षी घेतली..हो पण त्याआधी आम्ही गावाची एक चक्कर मारली हे सांगायचे राहून गेले..निवांत काळ्याभोर रत्यावर दुपारच्या चांदण्यांमध्ये आम्ही आमच्या पाउलांची हजेरी लावत फिरत होतो...दुपाराचीच वेळ असल्याने रस्त्यावर शुक-शुकाट होता..तसही भर गडबडीच्या वेळी पण या रस्त्याचा जीव गुदमरून जाईल अशी गर्दी कधी इथे होत नसावी..पुण्यातील रस्त्यांना नक्कीच या रस्त्याचा हेवा वाटेल! असो..इकडे गावामध्ये छान बसकी घरे आहेत काही आधुनिक काळाप्रमाणे बदलेली पण घरे आहेत..पण प्रत्येक घरात एक झोका नक्की असावा कारण मी जितक्या घरांमध्ये डोकावून पाहत होते तितके झोके दिसत होते..अरे हो या सगळ्यात एका साथीदाराची आठवण करून द्यायचीच राहिली.. श्री. भूभू श्वर अर्थातच बोली भाषेतील कुत्रा! याला आमच्या बच्चे कंपनी वर विशेष प्रेम असावे तो गावभर आमच्या मागे मागे फिरत होता..इतका कि देवळात गेलो तरी दर्शनासाठी हजर होता..देऊळ छान होते..इकडे प्रत्येक वास्तू च्या मागे एक सुपारीची बाग असते..या बागेमधून निघणार्या वाटेवर चालत गेलो कि मातीने पाऊल वाट सुरु होते आणि मग हळू हळू पांढरी वाळू वाट मऊ-भुसभुशीत करते..या वाटेवर पक्षांचा आवाज, पानांचा आवाज येतो पण जसा जसा समुद्र किनारा जवळ येतो तसा समुद्राच्या लाटांचा वाढत जाणारा आवाज शब्दात नाही पण मनात साठवाण्यासारखा असतो..



आम्ही पण अश्याच वाटेवरून समुद्र किनार्यावर पोहोचलो..आधी डोंगरावरून पाहिलेला समुद्र किनारा जवळून इतका सुंदर, मोहक दिसत होता कि आपल्या वयाचा, वेळेचा जणू काही विसर पडून जावा..मस्त त्या लाटांवर खेळावे एवेढेच काही आम्हाला सुचत होते..मग काय मस्त पाण्यामध्ये खेळायला सुरुवात केली..


No comments: