Monday, July 3, 2017

बाबा

'येते बाबा' अस म्हणत जेव्हा मुलगी बाबाचा निरोप घेते, लग्न मंडपात त्याची एवढीशी चिमुरडी त्याला आठवते
मोठे डोळे उघडून तिने जेव्हा आईच्या कुशीतून पाहिलं होतं पहिल्यांदा, आनंदाश्रू लपवत हसला होता तो बाबा
'तूच शाळेत सोड!' अस तिने गाल फुगवून सांगायचं, बाबानी अलगद उचलून त्याच्या परीला हवं ते द्यायचं
कधी मस्ती कधी मजा कधी त्याला गालबोट नको लागायला म्हणून त्याने रागवायच
आई नसताना घरात प्रेमाने हाताने करून भरवायच
यशात तिच्या त्याचा अभिमान, दुःख तिच्या मनात अश्रू याच्या डोळ्यांत
सगळा पसरा हा भावनांचा बाबा कसातरी सावरतो
'सुखी रहा सदा' आशीर्वाद तिला हसत देतो
ती होत गेली मोठी तसा बाबा तिचा सुपर हिरो होत गेला
सासरी गेली तरी तो तसाच मनात राहिला
आईला सारे सांगितले तरी बाबाची कौतुकाची थाप अजूनही हवी हवीशी
कितीही मोठी झाली तरी तीला बाबाच हवा भांबावून गेलेल्या क्षणांत,
कारण ती अजूनही निरागस हसू शकते बाबाच्या जगात

Sunday, May 14, 2017

ति. सौ.आईस

                                                  १४-मे-२०१७
                            ।। श्री।।        
ति.सौ.आईस,
                   शि.सा.नमस्कार
 आज माझा पहिला mother's day.असे days वगैरे मी मानत नाही पण आज whatsapp वरील सगळे मेसेज मी जातीने वाचले. काही सुंदर ओळी मनाला विचार करायला लावणाऱ्या होत्या.काहीतर मला कित्तेक वर्ष मागे घेऊन गेले. तुझी खूप आठवण आली आणि तुला काही सांगावंसं वाटले म्हणून हे पत्र
लहानपणी आई हेच मुलांचे विश्व।
"आईला एवढ्या सगळ्या रेसिपी कश्या लक्ष्यात रहातात ते आई कधी दमत नाही की कधी आमच्यासारखी हट्ट करते!" मला अस अप्रूप लहानपणी नेहमीच वाटायचे. आम्ही कितीही दमलो तरी कितीही दूरचा प्रवास करून तू आलेली असलीस तरी आधी आम्हाला काय हवाय हे बघायचीस. पण कधी दंगा मस्ती केला की जो काही धपाटा मिळायचा की बस्स. तू शिकविलेले अभ्यासाचे धडे आजही लक्षात आहेत माझ्या 😊.  अभ्यासू होण्याची आवड मला तू लावलेल्या चांगल्या सवयीनमुळेच.
मला अजूनही आठवतंय की मी शाळेतून आले की आधी तुला सगळी मजा सांगायचे. माझीच काय तू माझ्या सगळ्या मैत्रिणींची सुद्धा आवडती होतीस-आहेस!आमच्या बरोबर तू आमच्या वयाची होऊन जायचीस.
 एक ड्रेस मागितला की 2 मिळायचे मग त्या साठी तू दिवाळीला " आत्ताच तर घेतली ,नवीनच आहे" असं सांगत जुनी साडी नेसायचीस. तू स्वयंपाक करताना दिलेल्या छोट्या छोट्या टीप तेव्हा मी मनावर नाही घेतल्या पण त्या आज मला खूप कामी येतात. आजही भाजी छान झाली की नाही याचे प्रमाण म्हणजे चव आईच्या हातच्या भाजीसारखी आहे वा नाही,हेच आहे
आम्ही भावंडांनी बनवलेला new year special menu तू आणि बाबा कौतुकाने enjoy कारायचात,.
मग जस वय वाढत गेले तसे नवीन गोष्टी जास्त आकर्षित करायला लागल्या. पोळी भाजी पेक्षा पिझ्झा आवडायला लागला.आपले प्रत्येक विषयासाठी  स्वतंत्र विचार असायलाच हवे ही जिद्द. बाहेरच्या जगातील आव्हाने वाढली स्पर्धा वाढली आणि नकळत माझे मी विचारांचे वेगळे चष्मे डोळ्यावर चढवले. त्यात खूप उत्साह होता सगळं स्वबळावर कमविण्यासाठी. माझ्यातील मी अस्तिव सिद्ध करत बाहेरील जगात हुशार असण्याची पावती देत होता. मी खूप खुश होते. आता तुला सांगता येतील अश्या गोष्टी कमी होत्या अस मीच ठरविले."आई ला काय कळणार न इंजिनेरिंग मधील challenges! त्यापेक्षा बाबांशी बोलते, office मधील कटकटी नको तिला सांगायला तिला उगीचच टेन्शन येईल आणि मग ती शेजारच्या ताई कडून सल्ला घे, वहिनीशी बोलून बघ अस सांगेल. आता मी माझे प्रश्न सोडवू शकते!" असे किती तरी विषय तुला मी माझ्या या विचारांच्या filter लावून सांगायला लागले. जुन्या परंपरा, शिस्त, आरोग्याची काळजी या ना अनेक कारणांवरून मी किती भांडायचे आठवतंय ना तुला. किती सल्ले द्यायचे मी तुला ,तसे ते मी आजही देते 😁. तू सारख म्हणायचीस अस वाग, अमुक कर ,तमुक कर पण मी म्हणायच,"अग आई मी मोठी झालीये आता एवढी काळजी नको करुस"आणि तुझं उत्तर ठरलेलं असायचे" आई झालीस न की मग कळेल तुला!" किती फिल्मी बोलतेस म्हणून मी ते सगळं दुर्लक्षित केलं
आयुष्य रंगेबिरंगी गोल चक्र आहे आणि आपण त्यात सगळे रंग क्रमाने जगत असतो!
"आई ग!" ओठातून आलेली कळ थेट काळजातून निघाली होती. त्यादिवशी मी आई होणार होते. आई होण्याच्या शारीरिक वेदना काय असतात हे तेव्हा समजलं.  डॉकटरने माझ्या कन्येला पहिल्यांदा हृदयाशी धरायला दिल त्या वेळी तिची नाळ तोडली असली तरी माझ्या काळजाशी ती अतूट जोडली गेली.
मग तू मला भेटायला आलीस ती अजून माया उराशी बाळगून आई ची आजी होऊन. माझ्या बरोबर रात्रभर जागरण करताना तु आमच्या बालपणीचे, तुझ्या बाळंतपणाचे किस्से सांगत होतीस. मला खूप समजून घेत होतीस अगदी फुलासारखे जपत होतीस. तेव्हा मला माझी आई एक आईच्या नजरेतून पाहता आली. ज्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट काढले तिला मी वेळ प्रसंगी कशी काय अशी तिरसट उत्तर देते याची माझी मलाच लाज वाटायला लागली. आई, खरच अस वाटत होतं की किती सहन केले आहेस तू. आज तर इतक्या सोइ सुविधा आहेत तुझ्याकाळी असे काही नव्हते . किती कष्ट सोसले आहेस तू.
मूल कसेही वागले तरी आई नाही बदलत. तिला मुलाचे भविष्य सुंदर बनवायचं असत त्यासाठी ती सर्व प्रयत्न करते हे मला तुझ्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणविलेे.
आई ही आई असते जन्मभर. काही अति हुशार मुलांचे म्हणणे असते की हे तर तिचे कर्तव्य होते त्यात काय. त्यात काय आहे हे आई झाल्याशिवाय नाही कळणार(तुझा हा dialogue मी आता वापरायला शिकले आहे😇😜).
मला वाटत मी तुला खूपच गृहीत धरले. आईवर इतकं प्रेम असते की बहुतेक तिच्याशी आपण काही बोलू शकतो आणि मनाचे सगळे ताण विसरून जाऊ शकतो. कारण आई सागर समान आहे जे येते ते सामावून घेते. तिची माया अथांग आहे.
माझ्या आई होण्याच्या प्रवासामध्ये आता तू माझी नव्याने मैत्रीण झाली आहेेस.
मी एवढंच मागते की तुला खूप आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य मिळो आणि आपल्या मैत्री मधील मस्ती अशीच मजेत वाढत राहो.
अजून खूप काही लिहायचं आहे. कितीतरी प्रसंग मला मी आई म्हणून घडताना तुझी आठवण करून देतात तेव्हा मी मनात तुला आदराने नमस्कार करते. काही किस्से तुझे आठवून गालात हसते. पण तूच शिकविले आहेस की पत्र मुद्देसूद असावे उगीच फापट पसारा नसावा ☺. तसही तुला माझ्या मनात काय आहे हे मी न सांगताच कळते आजही ते कळेलच😊.काळजी घे.
                                      तुझी लाडकी,
                                       लेक

Saturday, November 28, 2015

रंगीलो राजस्थान-2

          शुभ संकेत म्हणावा तसा वाघोबा समोर येउन दर्शन देऊन गेला! मुंबई मधून समुद्राचे धडे घेऊन गेलेलो आम्ही रणथम्बोर मध्ये खरी थंडी ते काय याची मजा घेत होतो. पहाटेच्या धुक्यामध्ये फोटो काढत आमचा ताफा 'destination Jaipur '  निघाला. गावातील रस्ते  पावसामुळे रुसले होते आणि खड्ड्यामुळे आम्ही धक्यावर धक्के खात होतो. पण खिडकीतून दिसणारी झाडे, पोपटांचे थवे , मोर आणि धुक्यामधून हळूच डोकावणारी सूर्याची किरणे मोहक दिसत होती. अश्या वातावरणामध्ये बस थांबवून पेरू खरेदी नाही केली तर काय केले :)
असे अजून काही स्वदिष्ट break घेत आम्ही गुलाबी थंडीत, गुलाबी शहरामध्ये प्रवेश केला.
          सुंदर जागा, सुंदर सहप्रवासी आणि आता हुशार guide  ची भर पडली होती. जयपूरच्या गल्ली-रस्त्यांवरून जाताना येथील राजांचा वैभाशाली इतिहास रंगतदार बनला तो लहान मोठ्या किस्स्यांनी, जसा कि 'सवाई' हि पदवी येथील राजांना कशी मिळाली, पिंक सिटी च्या पिंक रंगाचा इतिहास, राजा सवाई जयसिंग यांच्या हुशारीचे किस्से, राजा सवाई मानसिंग यांच्या कर्तबगारीचे किस्से एकत होतो. संपूर्ण शहराची रचना वास्तुशास्त्रा नुसार केली आहे. आम्ही नवीन आणि जुने जयपूर मधील हवामहाल, SMS  नावाने सुरु होणार्या इमारती, राजस्थान मधील गरीब (?) लोकांचे बंगले, जंतर-मंतर डोळ्यांना सुख आणि डोक्याला विचारांचे चांगलेच खाद्य मिळत होते. संध्याकाळ झाली तशी सूर्याची नारंगी-जांभळी किरणे गारवा घेऊन बिरला मंदिर मध्ये चं रमली होती. अतिशय सुभक आणि विचार्पुवक केलेले कोरीव काम, जणू काही पारदर्शक वाटावा एवढे सुंदर संगमरवरीमध्ये केलेले काम! डोळ्यात ते सगळे साठवता साठवता आम्ही चार क्षण तिथे विसावलो. मंदिरामागे दिसनरल मोती डोंगरी आणि सुंदर गणपती बाप्पा , सारे काही योग्य त्या वेळी घडत होते. अजून एक आठवणीतील अनुभव म्हणजे आम्ही ज्या hotel  मध्ये थांबलो होतो तेथील rotating deck वरील जेवणासोबत आमची गझलमुळे सुरमयी झालेली रात्र. दिवसभर आम्ही जयपूरची प्रदक्षिणा करत होतो आता रात्री सारे जयपूर आमच्याभोवती फिरत होते
        नवीन दिवस सुरूर झाला तो इतिहासातील अजून एक वास्तू पाहण्याचा-आमेर फोर्ट. सुंदर आवर, राजेशाही संगीत आणि डोलत चालणारे हत्ती, आमेर फोर्ट मधील ती सकाळ वेगळाच अनुभव देऊन गेली. लोकांनी इतिहासातून शिकावे हे खरे पण काय शिकावे हा ज्याचा त्याचा भाग आहे. येथील राजाला १२ राण्या होत्या-प्रत्येक राशीची एक बयको. राणी म्हणे जेह्वा राजासाठी तयार होत असे तेह्वा एवढे अलंकार आणि वेशभूषा करायची कि तिला दासी एका खास मार्गाने व्हील chair ने राजाकडे घेऊन जात असत. आम्ही यात रमून गेलो कि काय ते वैभव, यांचा summer palace  काय , सुंदर ती बाग काय, आरश्यांचे सुंदर नाजूक काम असो वा चतुराई ने केलेली संगमरवरील नक्षीकाम! पण आमचे अवलिया बाबा यांनी १२ राण्यांचे जरा जास्तच मनावर घेतले होते. एवढा दिलखुलास आनंद एकट्याने थोडाच कमावता येतो, याला तशी दिलखुलास मंडळी हवीच. आम्ही देखील मग अवलिया बाबांच्या मोहिमेत त्यांना मदत करायची ठरवली :)
          आता वेळ होती ती जगातील एकमेव ब्रम्ह देवाचे मंदिर पाहण्याची. कळलाव्या नारदाची कथा ऎकलि आणि  शांत पुष्कर मध्ये आम्ही मंदिरात दर्शन घेतले. आता पर्यंत सारे सहप्रवासी होते आता वेळ होती ती अजून एकमेकांना जाणून घेण्याची. मस्त camp fire च्या प्रकाशात सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. या प्रवासात अजून काय ते शुभ आशीर्वाद जोडायचे म्हणून आम्ही निघालो ते अजमेर कडे . मोहमाद्दिन चिश्ती यांच्या दर्गः चे दर्शन घेतले. इथे अजूनही दर्गा ला जाण्यासाठी तंग्यामधून जावे लागते. अध्यात्मा कडून परत इतिहासामध्ये जायची मनाला आता ओढ लागली होती ती चित्तोडगढची. इतक्या कथा आणि किस्से एकले होते या अमर वस्तूचे कि मनाची उत्सुकता वाढली होती. 'चित्तोडगढ' नाव जसे भारदस्त तसे असे वाटत होते तेथील मातीचा प्रत्येक कण  स्वाभिमान, मातृभीचे प्रेम, खंबीर आणि संस्कृतीला, प्रजेला जपणाऱ्या राजाला विनम्रतेने सलाम करत होते. 
जो भरा नहि हें भावोंसे, 
भेहती जिसमे रसधार नहीं,
वो हृदय नहीं वो तो पत्थर हें,
जिसमे अपने स्वदेश का प्यार नहीं  
अश्या खड्या आवाजात guide ने भावपूर्ण कवितेने चित्तोडगड च्या इतिहासाची  प्रस्तावना मांडली .आमचा प्रत्येक श्वास, तेथील प्रत्येक क्षण इतिहासामध्ये मिसळून जात होता. चित्रांगदा मौर्य(मोरी) ने ठेवलेल्या पहिल्या पावलापासून चित्तोडगढची सुरुवात झाली. किती तरी चढउतार पाहून धैर्याने मान ताठ करून विजय स्तंभ अभिमानाने शांत उभा होता.  तेथील प्रत्येक वास्तूची कथा आमचे guide जिवंत करून सांगत होते.पद्मावतीची सौंदर्याची कथा त्यातून आन-बाण जपण्यासाठी निर्माण झालेली युद्ध, जोहर, पन्नाबाई च्या बलदानाची कथा, महाराणा प्रतापच्या शौर्याची कथा मनाला भिडत होती. जणू वाटत होते हे सारे आत्ता आमच्या समोर घडत आहे . मीराबाईच्या श्रीकृष्ण भक्तीमध्ये तृप्त झालेली भजने एकत सुर्य मावळला. चित्तोडगढ वरील प्रत्येक क्षण तो दिवस अवस्मरणीय!      
रणथम्बोर, जयपूर , आमेर, पुष्कर, अजमेर, चित्तोडगढ! दिवसेंदिवस प्रवास अधिक मनमोहक होत होता. आता next destination उदयपूर! 

          

Wednesday, April 8, 2015

आजी आणि माती

पहाटे ४ वाजले होते, मुसळधार पाऊस  पडत होता, सुसाट वारा झाडांच्या फांद्यातून पाने उडवत होता. काही घरे शांत झोपली होती, काही खिडक्या वाजत होत्या. टीम टीमणारे  दिवे काळोख पुसत होते. विजांची दिशा व्यापत आकशामध्ये थैमान घालत होत्या. गावातील शांतता आता वादळाने भंग केली होती आणि वेशी पाशी असणारया मंदिरातील दिव्याची ज्योती मंदपणे झळकत सगळा पाहत होती . कच्चे रस्ते पाचोळा, माती वाहत घेऊन पाण्याच्या धारा नदीकडे धावत होत्या. मोठी झाडे मोडून पडली होती आणि फुलांची आरास अंगणामध्ये होत. त्यातून वाट काढत थरथर कापत एक सावली दारापाशी आली, आडोसा बघून पायरीवर विसावली.
ढगांचा मनसोक्त पाण्याशी खेळ झाला आणि स्वारी आकाशातून वारा नेईल तिकडे निघून गेली . एव्हाना सुर्य प्रकाश घेऊन ओल्या जगाला सोनेरी करून गेला होता. ती साखर झोपेतून जागी झाली. रोजच्या दिन क्रमाप्रमाणे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत जमिनीला नमस्कार केला. तेवढ्यात दाराची बेल वाजली "दूधवाला आला असेल, त्याला सांगायचे होते आज जरा जास्त दुध हवे". सोमवार, शिवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करायचा कधी विसरली नाही ती.
आजी : "बर आहे न सगळा नाम्या , वेळ लावला आज यायला " दूधवाल्याला आपुलकीने विचारले.
दूधवाला नाम्या : " अव काय सांगायचा, लई थैमान घातलाय पावसान रातच्याला, तुमचा सोमवार हाय नव्ह आलो बघा दुध द्यायला वाट काढत".
आजी: "खुश रहा बाळ " तिने कौतुक केले
नाम्या : "काय आजी, पावन आल्यात दिसतंय. पण हित दाराभाहीर काय म्हणून झोपवलय?" पायरी वर अंग चोरून झोपलेल्या व्यक्ती कडे बोट करत नाम्याने आजीला विचारले
आजी: " कोण आहे तिकडे?" आजीने आवाजाला काळजीचा सूर लावत विचारले

"मी हाय जी, माती" डोळे चोळत वर बघत व्यक्तीने उत्तर दिले.

आजी: "माती ? अग बाळ, नाव विचारले मी तुझे. काल पावसात रस्ता चुकलीस का?"

माती: " माती नाव हाय जी  माज. पोरटी नग व्हती जी  बापाला, म्हणून माईन नाव ठेवलयजी. ती म्हणायची धरणी सामद्यांची आय असते. तुले तिच्या कडे राहावे लागेल. बाप तर नाई ठेऊन घेणार घराला. रातच्याला लई पाणी बरसले जी म्हणून हितच निवारा घेतला जी. निघतो आता" अस म्हणत माती चटकन उठली. विस्कटलेले केस कसेबसे सावरले आणि गाठोडे घेतले.

आजी: " बरच बोलतेस ग एवढ्याश्या वयामध्ये , कुठे जाणार एकटी ?चहा घेऊन जा हो घोटभर" आजीने प्रेमाने हात फिरवला मातीच्या डोक्यावरून.

माती: " मी? म्होरल्या शालेला जाणार है जी. शाला झाडतो जी म्या. गुरुजी मला मग गणित शिकावित्यात ५ वी तुकडीच"

आजी: "अरे वाह! चल मग सांग बघू ४ गुणिले ५ किती?" आजीने मातीची फिरकी घ्यायला प्रश्न केला

माती: "सोप्पा हाई कि, २० आणि काय! पाढ पाठ केल्याविना जेवत नाई." समोरचे दोन तुटलेले दात लपवत माती गालात हसली.

आजी: "शाब्बास! माझ्याकडे बाजाराचे काम करणार का? तुला शाळेचा गणवेश आणि पुस्तके मी घेऊन देईन" आजीने विचारले

माती: "व्हय जी" अस म्हणत माती उड्या मारत अंगणभर नाचली

आजीने मातीला परिसाचा स्पर्श करावा तसे सोनेरी संस्कार दिले. तिला खूप शिकविले अगदी तिच्या इतर नातवंडानचे जसे लाड करते तसेच. मातीचे १० चे शिक्षण पूर्ण झाले तिने आजीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
आजी: "खुश रहा पोरी. अशीच यशस्वी हो"
माती: " आजी आज गेली ५ वर्ष तू माझा सांभाळ करतेस. तुला एक विचारू का?" मातीने आवाजाला आदराची समज देऊन परवानगी मागितली
आजी: "विचार न बाळ."
माती : "आजी तुझी एवढी मुले कशी सांभाळतेस ग? तू माझे नाव मातीच का राहू दिलेस?" एकाच श्वासात माती ने सगळे प्रश्न विचाराचे ठरवले होते
आजी: " माती, नाव हि आपली ओळख नसते,  आपण नावाला ओळख देतो. आपली वागणूक, आपली विचारसारणी याने नावाला परिपूर्णता मिळते. तुझ्या वडिलांना तू मुलगी म्हणून नको होतीस. तुझ्या आईला तूला जगताना पहायची ओढ होती. तिने तुला जे नाव दिले त्या नावाने आजही ती तुला ओळखावी आणि तिच्या स्वप्नांना पूर्णता मिळावी. हीच माझी इच्छा होती. माती, यासाठीच मी तुझे नाव नाही बदलले.
आपले मुल ज्या दिशेने धावते ती आईसाठी प्रकाशाची दिशा असते. मुल दिसानसे झाले कि मागे उरतो तो फक्त काळोख." मोठा नि:श्वास सोडत आजी एक क्षण  थांबली आणि परत सांगू लागली "माझा प्रकाश एका वादळात हरवून गेला. शेवटचे पहिले तेव्हा तुझ्याच वयाची असतील माझी मुले." आजीच्या डोळ्यातून पाणी आले. माती पुढे आली आपला आधार द्यायला. आजी म्हणाली" आपण एकटेच असतो, पण फ़क़्त तोपर्यंत जोपर्यंत आपण कोणाचा एकटेपणा दूर करत नाही." अश्रू लपवत पुढे म्हणाली" ज्या क्षणी मी एकटी झाले त्या क्षणी मी ठरवले, कोणालाही मायेची गरज आहे त्यांना हात द्यायचा. बघत बघत अनेक मुले जोडली गेली. आता ती सारी शिकून मोठी झाली आहेत. आज बघ माझा हात तुझ्या हाती आणि तुझे हात अजून कोणाच्या हाती देशील तर जग प्रेमाने भरून जाईल"

मातीने आजीला वचन दिले कि ती तिच्यातील माणुसकी जपेल. माणुसकीला प्रेमाने गुणले आणि व्देशाला मायेने भागले तर जग कित्ती सुंदर होईल, हो न? 





रंगीलो राजस्थान भाग-१

आनंदाचे डोही, आनंद तरंग!! वाह, चक्क ऑफिस मधून १० दिवस सुट्टी मिळाली. सहलीसाठी सामानाची खरेदी, packing लिस्ट सुरु झाली आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण १०० टक्के वाढले आहे असे वाटू लागले! विमानातून जयपूरकडे जाताना वाटले आपल्या स्वातंत्र्याला पंख मिळाले.
जयपूरमध्ये आगमन केले आणि थंड हवेच्या  गारव्याने हसत स्वागत केले. मउ शाल आणि रंगीत टोपीतून मिळणारी उब आणि हवेतील कधी धुसर तर कधी कडक थंडीचा स्पर्श मस्त वाटत होत. मनाला तजेला मिळाला. आता आम्ही वाट बघत होतो ते सहलीमधील इतर नवीन प्रवाशांची.
स्मित हास्य देऊन बराच वेळ आमच्याकडे पाहणारे एक म्हातारे जोडपे दिसले. आम्हीपण हसलो त्यांच्याकडे पाहून आणि भली मोठी कपड्यांची गाडी (bag ) घेऊन त्याच्या शेजारी जाऊन उभे राहिलो. तसे गोरेपान काका म्हणाले " I am Kobad from Canada .  This is my wife " गालावरील दोन्ही खळ्या थंडीने गुलाबी झालेल्या गालावर मिरवीत काकूंनी नाजूक smile दिली . काकांचे नाव तसे चार चौघापेक्षा वेगळे होते म्हणून आम्ही परत विचारले. तसे काका निळे डोळे मोठे करत म्हणाले माझ्या आईला मी दंगा करायचो म्हणून नाई आवडायचो न म्हणून तिने माझे नाव ठेवले ko-bad आणि मिस्किल हसू दिले. आम्हीही हसलो आणि आमची ओळख करून दिली.
पिळदार मिश्या, मध्यम बांधा , केस सुट्टीवर गेलेले आणि बोलण्यात ठेका हि आज-काल दुर्मिळ झालेली व्यक्तिरेखा आमच्याकडे बघून आपल्या सौ. बरोबर बराच वेळ काहीतरी बोलताना मी तिरक्या नजरेमधून पहात होते. शेवटी राहवले नाही म्हणून मी काकांना स्मित हास्य दिले. नवरा-बायकोमधील नात्यातील आदरयुक्त भीतीची मला नेहमीच गम्मत वाटते पण इकडे प्रकरण खूपच मजेदार होते. काकूना सगळ्या आयुष्याच्या किल्ल्या देऊन काका निवांत मजा लुटत होते. त्यांच्या बोलण्याला विनोदाचा स्पर्श आणि वागण्याला रांगडी रंगीत सवय होती. काकूंनी काकांचे नाव अवलिया बाबा ठेवले होते असे आम्हाला समजले. इतर सहप्रवासी देखील त्यांना याच नावाने बोलावू लागले आणि काकांच्या अखंडित मजा-मस्तीचा आशीर्वाद लाभला.
आमची गाडी आली आणि सगळे दिलेल्या seat number वर जाऊन बसले. दंगेखोर मुलांना कसा शेवटचा  bench प्रिय तसा आम्हाला नशिबाने शेवटच्या seats मिळाल्या. आमच्या समोरील seats वर एक मारवाडी जोडपे होते. सगळी जवाबदारी मुलांना देऊन चार दिवस  बायकोबरोबर फिरायला आलेले काका शांत आणि गंभीर स्वरूपाचे असावे असे मला वाटले. काकू आणि काका यांची उंची लहान पण चेहयावरील भाव महा शांत होते. डॉक्टर फॅमिली , मुम्बई ची happy-go-lucky फॅमिली असो वा आयुष्यातील अनुभवान्नी समृद्ध झालेली जोड़पी, आत्ता पर्यंत ओळख झालेली मंडळी दिलसे दिलखुलास होती.
जयपूर ते रणथम्बोर हा प्रवास लोकांच्या स्वभावाचे शोध लावण्यामध्ये कसा पार पडला समजलेच नाही. आमचा team leader प्रवासाच्या पुढील कार्यक्रमाची घोषणा करायला उभा राहिला. त्याने जी काही माहिती सांगितली ती पुढील येणाऱ्या क्षणांची उत्चुकता १० पट करणारी होती." रंणथबोर मधील वाघ पाहण्यासाठी देशातून नाही तर परदेशातूनही लोक येतात. हा अनुभव जेवढा रोमांचकारी तेवढाच दुर्मिळ आहे. तुम्हा सर्वांना resort वर गेल्यावर १० मिनिटे आहेत जेवण करायला.  तिथून आपण जंगलातील खास गाडीने वाघ बघायला निघणार आहोत. " उबदार बस मधुन जसे सगळे बाहेर आलो तसे कडक थंडीने आम्हाला वेढले. मस्त गरम गरम जेवणावर ताव मारल्यावर आम्ही वाघोबा दर्शनसाठी निघालो. हा अनुभव आयुष्यातील रोमांचकारी अनुभव असणार आहे याची काहीच कल्पना नव्हती!
आम्हाला तसा बराच वेळ झाला होता. नियमानुसार कदाचित 5min आम्ही नाही पोहोचलो तर फक्त प्रवेश द्वाराचे दर्शन घेऊन परत यावे लागले असते. मन गाड़ी च्या पुढे धावत होते. आम्हाला प्रवेश मिळाला.पुढे काय दिसणार, कसा अनुभव येणार याचा विचार करत असतानाच एका प्राण्याचा आवाज आला. आमच्या guide ने सगळ्यांना शांत बसायला सांगितले.काही प्राणी तलवाजवळ होते ते जिव मुठीत धरून पळत होते.माकड़ झाडांच्या फांदीवरन सावध करत होते.आम्ही श्वास रोखून जंगलामधील हे दृष्य पहात होते. तेवढ्यात आमच्या गाइड ने गाड़ी मागे घेतली.आमचे डोळे समोरील रानवाटे कड़े होते. काही क्षण झाले आणि दिमाखात चालत वघोबा आला. मनात भिती होती ती वाघोबाच्या रूपाने व्यापुन गेली होती. त्यानेपण आमचा भाव ओळखला असावा. मनसोक्त दर्शन दिले.त्याची चाल, तो आवाज,ती झेप,तो बसण्या-उठण्यातील मानीपणा. वाह!क्या बात !क्या बात! क्या बात!!!

Thursday, June 27, 2013

Mrs. Perfect!


        आज खूप दिवसांनी स्वत:ला रोजच्यापेक्षा वेगळे बघायचे ठरविले होते. लहानपणी कसे आपण 'time  please ' म्हणायचो आणि काही सेकंदांनी खेळ परत सुरु व्हायचा तसेच काहीसे वाटत होते . कित्ती दिवस झाले मनात एक विषय घोळत होता. स्त्रिया पुरुषांपेक्षा आपले आयुष्य जास्त 'perfect ' असावे यासाठी धडपड करत असतात. सहजच कॉफी टेबल वर निघालेला विषय होता पण मनात आपलासा वाटला. 

          आपण आहोत तसे आहोत आणि काही झाले तरी बदलणार नाही असे मी तोऱ्यात सांगायचे. मला वाटायचे कि मी खूप वेगळी आहे. पण मला आत्ता समजतय कि मी लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चक्क आईसारखा वागायचा प्रयत्न करत होते. आई बनवते तसाच भाजीचा रंग आला कि मला १०० पैकी १०० गुण मिळाल्या सारखे वाटायचे. 'घर असे ठेवायला हवे, तशी शिस्त असायला हवी' हि कानाडोळा केलीली आईची वाक्ये आता सारखी मनात असतात. पाहुणे आली कि चांगली सून म्हणून , स्वयंपाक करायला गेले कि सुग्रण म्हणून मिरवायचा, घर आरश्याप्रमाणे चकचकीत-शिस्तीत ठेवायचा जणू मनाला आग्रह!शरीर दमून जाईल पण सगळे 'perfect ' झाल्याशिवाय झोपायचे नाही.  मग ऑफिसमध्ये पण आपण हुशार आहोत कळायलाच हवे. जिद्दीने न चुकता नेटाने पूर्ण झोकून देऊन कामे करायचे आणि अजून चांगले वागता येईल का याची सतत तयारी करायची. 

             नोकरी  करणाऱ्या चार महिलांपेक्षा मी असे वेगळे काहीच करत नाही. पण मुद्दा असा आहे कि चार हात आणि २  डोकी असणाऱ्या रुपाची मनाला ओढ का असते. जे करेन ते Perfect  करेन. लग्नानंतर सून, नात-सून, वाहिनी, काकू या नात्यांची जबाबदारी का वाटते?आमच्या ऑफिस मधील महिला-मंडळाचा हा नेहमीचा प्रश्न आहे . बर नवरे लोक याचा आग्रह धरतात का ,तर मुळीच नाही ते खुश असतात आणि आपणही जमेल तेवढ करून खुश राहावे असेच सल्ले देतात. मला आठवत नाही कोणत्याही पुरुषाने इतके भावनीक होऊन मला लग्नानंतर नवरा, जावई ,नात-जावई , काका झाल्याची जाणीव होतीय,जबाबदारी वाटतीय असे सांगितले असेल  .ते दोन दिवसांचा विचार करतात आणि २ तासांनी काय विचार केला होता हे विसरून जातात. कारण लहानपणा  पासून असे  भावनिक जग घडायचे प्रसंग फार कमी येतात त्यांच्या वाट्याला . मला नाही वाटत कोणती आई तिच्या मुलाला कधीही हे वाक्य म्हणाली असेल कि 'उद्या तू कोणत्या तरी घराचा जावई होशील ,आता तरी चार भाज्या ओळखायला शिक!' पण मुलींना लहानपणा पासून काळजी,माया आणि आपुलकीची ,त्याला व्यक्त करण्याची कला अवगत असते. त्यातच घरातील सारे खत-पाणी घालतात. तिला चांगले शैक्षणिक जीवन देतात कि ज्याने ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल. पण तिच्या भावनिक जगाचे काय? त्यात तिला स्वतंत्र राहण्याची आणि त्यातून आत्म-निर्भर होण्याची गरज नाही का?
          माझ्या ओळखीच्या किती तरी काम करणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्या मला सांगतात कि 'मी दिवसभर मुलाला/मुलीला पाळणा घरात ठेवते/सासु-सासाऱ्यानकडे ठेवते, त्याचे मला खूप वाईट वाटते,म्हणून मग मुलांना कधी मी रागवत नाही घरी गेले कि त्यांचे खूप लाड करते'. हि धडपड 'perfect  आई' होण्याची . मी डबा नेत नाही म्हणून खूप जणी सांगतात बरे आहे तुझे सासू-सासरे नाही राहत न तुमच्या बरोबर ,मी तर पहाटे  ५ वाजता उठून स्वयंपाक करते ,आमच्याकडे चालत नाही असे काही. परत तेच 'चांगली सून' असण्याची धडपड. नोकरी नाही करणाऱ्या महिला पण याच शर्यतीमध्ये असतात. मुलांसाठी ,घरातील मोठ्यांसाठी किती तरी इच्छा  त्या पाण्यावर सोडून देतात, वेळे प्रमाणे लोणचे मुरते तश्या त्याही संसारामध्ये मुरत जातात. रूढी परंपरा पुढे चालवायला हरकत नाही पण समजून उमजून पुढे घेतल्या जात नाहीत. आधुनिक काळ आपण म्हणतो पण आज एक स्त्री म्हणून आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:बरोबर न्याय करतो का? आई, बहिण,मुलगी, बायको,सून,काकू,मामी, मावशी आणि बरीच नाती या पलीकडे आपले नाते आहे ना स्वत:शी . त्याला कधी न्याय मिलेल?!
हे सगळे लिहिता लिहिता वाटतंय कि बंधने हि मनाची आहेत . मनाला सारखे सांगायला हवे कि मी आधी माझ्यावर प्रेम करायला हवे. लोक काय म्हणतील या चौकटीमधून बाहेर पडायला हवे. मी स्वत: जीवनाचा माझ्या कला गुणांचा आदर करायला हवा. मी मनापासून खुश असेन तरच मी इतर लोकांना आनंद वाटू शकते, नवीन दिशांना आपलेसे करू शकते. मी माझे स्वतंत्र विचार जपायला हवे. Perfect असे या जगात काहीच नाही. कोणीतरी म्हणलेच आहे न कि कधी कधी अपूर्णतेमध्येच जीवनाची संपूर्णता मिळते!

मी आहे फुलपाखरू,मी रंग इंद्रधनुचे ,
मी झुळूक वाऱ्याची,मी वादळ भावनांचे, दर्पण मनाचे,
मी  उत्तर  कोड्याचे, मी वाहते पाणी झऱ्याचे,
मी थेंब बरसणारे, मी पक्षी आकाशी उडणारे
धरती मी मृदू शीतल, अंकुर  जन्म देणारी
मी  स्वप्नांची वाट, कधी शांत समई देवघरातील

मी नक्षत्रानची राणी, मी वीज आकाशातून कोसळणारी,
मी लाट समुद्र घेऊन येणारी,मी मनसोक्त गाणी
मी कधी ज्वाला कधी ज्योत, कधी सोनेरी पहाट
मी आरसा निसर्गाचा मी प्रकृतीच्या कणात  कणात !!!

Sunday, December 30, 2012

अनमोल नाती-भाग ३

खरच असे असते का प्रश्न विचारण्या  आधीच उत्तर मिळते का, 
हसू ओठातून ओसंडून वाहते, नात्यांची व्याख्या बदलून जाते, 
खरच असे  असते का...
रुसून दूर निघून जातो, भांडतो तरी मनाचा एक हिस्सा रिकामा त्या नात्या साठीच असतो, सुखाचे धागे दोरे नकळत जुळत जातात अजून दृढ बनवत, 
आठवणीच्या गावामध्ये मनापासून वाट  बघत, 
खरच असे असते का...
दिवस किती वर्षे याची या नात्याला काही पर्वा नसते, मनाला मन ओळखून असते, एवढे मनापासून आपले कोणी चांगले चिंतन करणारे, हक्काने आपल्या जीवनात रंग उधळत जाणारे,
 खरच असे असते का..
 सारे जग विसरून गेले तरी आपल्याला न विसरणारे , देवासारखे जाणते-अजाणते पाठीशी कोणी असते, खरच खरच हे असेच असतेच ना, मैत्री ज्याला म्हणतात त्याची कदाचित हीच व्याख्या असते ना..

आयुष्य पण काय सही कथा रंगवत असते. आपण कल्पनाही नाही करणार असे प्रसंग आपल्या बरोबर घडत असतात आणि आपण विचार करण्या आधीच सारे घडून जाते. काही लोक उगीचच आवडत नाहीत आणि काही लोक असे काही मनात घर करतात कि आयुष्य लिहिणाऱ्याला त्या देवाला "क्या बात!" म्हणावेसे वाटते. माझ्या आयुष्याच्या प्रवासासाठी देवाने खूप छान  सह-प्रवासी निवडलेले आहेत. प्रसंगातून सुरुवात आणि सुरुवातीपासूनच मनाला भावणारे असे माझे विशेष सव-प्रवासी! "अनोमोल नाती" याच्या आधीच्या भागात मी असेच काही लिहिले होते. तसे सगळेच सहप्रवाशी विशेष आहेत पण हा भाग खास लिहीतीय ते मनाने खूपच जवळच्या आणि मैत्रीच्या नात्याला माझ्या आयुष्यात एक धमाल मस्ती घेऊन आलेल्या मैत्रिणीसाठी.
 माझी नाती जपण्याची परिभाषा खूप वेगळी आहे. मी हक्काने केह्वाही लोकांना call  करते आणि कधी वर्षानु-वर्षे दोन ओळींचे पत्रही लिहित नाही. माझा असा स्वभाव असूनही फ़क़्त माझ्यातील चांगले काय ते लक्षात ठेवून मला मनापासून प्रेम करनार्या, प्रसंगी मला फोन करून मनसोक्त स्तुती-सुमने उधळून चीड-चीड करणाऱ्या पण मग तेवढ्याच काळजीने , आपुलकीने विचारपूस करणाऱ्या मैत्रिणींना मी देवाचे आशीर्वाद मानते.
२-३ वर्ष एकाच कंपनीमध्ये  काम केल्यामुळे म्हणा किंवा काम काही विशेष नसल्यामुळे, मला इतर लोकांसारखा कंपनी विषयी खास असा काही राग नसे. मस्त मनाला हवे तेव्हा यायचे आणि मस्त गप्पा मारून घरी निघून जायचे. खरच मस्त आळशी दिवस चालू होते. देवाला देखील तेह्वा विशेष काम नसावे त्याने एका नवीन व्यक्तीची प्रवेशिका इथेच लिहिली. आमच्या cubical मध्ये एक नवीन मुलगी आली. स्वत:हून कशाला बोला "ती" नवीन आली आहे चुकून बोलत बोलत नको तो जोक मारला तर पळून जाईल इकडून म्हणून मी आपले तिला बघून न-बघितल्या सारखे केले. पण काय सांगू हि तर माझ्याहून जास्त बड-बडी निघाली..एवढी कि मी प्रसंगी शांत बसायचे. मला तिची हि गोष्ट आवडली आणि आमची मैत्री जुळली. जवळची मैत्रीण असणे किती गरजेचे असते हि एक "खास" मैत्रीण असणारी व्यक्तीच सांगू शकते. ड्रेस किती छान आहे पासून ते "अग अमुक-अमुक झाले आणि मग तमुक झाले" असे गोस्सीप करणे म्हणजे किती मजा  असते म्हणून सांगू. 
गप्पा, गोष्टी, किस्से, आठवणी ,तुझा बॉस , माझा बॉस , म्हनून सुरुवात झालेली हि हलकी-फुलकी मैत्री रोजच्या दिनचर्ये मध्ये आपसूकच सामावून गेली होती. घरी कांदा पोह्याचे कार्यक्रम सुरु झाले आणि मग आमच्या गप्पांच्या यादीत एक महत्वाचा विषय जोडला गेला. या विषयावर बोलताना समजले कि अरे हि मुलगी जेवढी स्पष्टवक्ती आहे तेवढेच आयुष्यात तिला काय करायचे आहे  हे हि ती तितक्याच ठाम पणे  मांडू शकते.  प्रसंगी तिच्यातील भाबडेपणा तिच्यातील छोट्या मुलीची आठवण करून द्यायचा. जीवनाविषयी तिची काय विचार सारणी आहे हे जस जसे मला समजत गेले तसतसा माझ्या मनातील तिच्या विषयीचा आदर वाढत गेला.
 मला नव्याने मैत्रीची जाणीव करून देणारी ऑफिस  मध्येच काय पण  माझ्या घरी पण लाडकी  झालेली मैत्रीण आता सौ. बनणार हे एकूण काय धमाल वाटली! मनाचा पण जरा  एक प्रोब्लेम असतो एकाच क्षणात मन हजार गोष्टींचा विचार करते. लग्नाची बातमी एकून एक पापणी आनंदाने ओली  झाली तर दुसरी काहीतरी जवळचे खूप लांब चालले आहे याने पाणावली.खरतर आज जग छोटे झाले आहे . e-mail, फोन अश्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी संपर्क साधू शकता पण मला तर हे क्षणिक वाटते ..मी काही कारणांमुळे या खास मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. फक्त तिला १० वेळा फोन करून शुभेच्छा देणे  हातात होते..पण तिच्या आयुष्यातील त्या खास दिवशी खुलून आलेली सहज लाजणारी गुलाबी छटा, तिच्या चि.सौ.का. चे सौ. बनतानाचे अनेक आशांनी, स्वप्नांनी चमकणारे डोळे, तिच्या स्वप्नातील राज-कुमारासाठी तिने घेतलेला पहिला उखाणा, संस्कारांची शिदोरी मनात साठवून जड पावलांनी माहेरचा घेतलेला निरोप सारे काही शब्दात बांधता येईल का? मैत्री किंवा कोणतेच नाते शब्दांच्या पलीकडील असते. आता ती परदेशी निघून जाईल  तेह्वा तिच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग मला फोटो मधून समजातील, त्याचे वर्णन फोने वरून समजेल..पण मी तिला नक्कीच miss करेन.
तिने आयुष्यात खूप प्रगती करावी आणि तिने तिच्या संसारासाठी पाहिलेली स्वप्ने साकार व्हावी , सुखांचा गुणाकार आणि दुखांचा भागाकार करत नव्या दिवसांना तिने भेटावे हीच सदिच्छा..


Sunday, October 7, 2012

कवितेतील पाऊस-पावसाची कविता

'पाऊस' हा बहुतेक लोकांचा आवडता विषय आहे. हा विषय निघाला कि लोकांकडे बोलण्यासारखा एक तरी अनुभव असतोच..बरसणाऱ्या सरींना पहिले कि चारोळी सुचते, गाणी सुचतात असे सुंदर अनुभव आहेत. तर नुसते ढग गडगडले तरी आज पावसाने काम गडबडणार असे वाटणारे दिवसही आहेत. तेच थेंब, तोच गारवा, तीच हिरवे पाने, धावणारा वारा पण त्यातून मिळणारा अनुभव वेगळा.अश्याच वेग-वेगळ्या आशयाच्या  दोन कविता इथे मांडत आहे.तुम्हाला कवितेतील पाऊस जवळचा वाटला कि पावसावरील कविता नक्की सांगा!

कवितेतील पाऊस


ऐटीत आला आला ,गजरात हजार ढगांच्या,
राजा ऋतूंचा डौलात चालला ,धरणीला भेटायला...

थेंब थेंब बरसतो,जणू झंकार मनीचा,
वीज काढी  खोडी, निळ्या प्रीतीचा ओलावा...
 
कळी उमलते  दारी जुई नाजूक लाजणारी,
धरणी आतुरतेने बघते सारे,मृदगंध दरवळतो सुखाचा...

नेसून हिरवा शालू अवनी पालवी-पालवीतून हसली,
रंग उधळत फुलांचे,रान-वनात मोहरून गेली ..

धरणी झाली समृद्ध,रम्य हा निसर्ग सोहळा,
ऋतूराजा गेला सृष्टीत सामावून,पुन्हा नव्याने धरणीला भेटायला....



पावसाची कविता

आला आला वारा  संगे पावसाच्या धारा,
 छत्री उघडा सारे घरी लवकर चला..लवकर पळा ..

तेज नजर ठेवा वाढेल ट्राफिक चा पसारा,
पाणी सारीदूर चाकातून उडतो फवारा..चुकवा फवारा 

नका पाहुत रोखून नाही थांबणार रिक्षेवाला,
मनी नाम घेत देवाचे बसमागे धावा..सामान वाचवा 
 
नको नको म्हणताना रेनकोटने दगा दिला,
 कापडी जगाला लाभला ओलावा..गारवा गारवा 

बंद पडेल दुचाकी  वेग वाढवावा जरा..
विसरा खड्ड्यांना मागच्याने जीव सांभाळा..तोल सांभाळा 

गेला गेला पाऊस सारे भिजवून गेला,
कांदा-भजीची ओढ लागते मनाला..ओढ मनाला


.

 


Friday, June 22, 2012

लग्नाच्या अलीकडे-पलीकडे

आज कोणीतरी 'तुझे लग्न कसे ठरले?' असा प्रश्न विचारला आणि मी उत्तर देता देता जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. दिवस किती भराभर धावतात.कधी असे दिवस होते कि मी जेव्हा माझा होणारा नवरा कसा असेल याची स्वप्न पहात होते आणि आज आमच्या लग्नाला बघता  बघता 6 महिने पूर्ण पण झाले.

लाग्नाआधीचे दिवस म्हणजे स्वप्नांची दुनिया असते। ती इतकी मोहक असते कि आपण जसा विचार करू तसेच जग आपल्याभोवती फिरेल असे नेहमी वाटत राहते।mobile- हिंदी गाणी जवळ वाटायला लागतात, घरी greeting कार्ड आणि फुलांचे येणे जाणे सुरु होते.कधी बोलताना विचार केलाही नसेल पण आता भावनांना व्यक्त करताना शब्दांमध्ये बांधणे अवघड होऊन जाते। मस्त फिल्मी वाटते पण तरीही आपले खास नाते सगळ्यांपेक्षा वेगळे आहे असेही मनाने ठरवून टाकलेले असते ।आपण कोणासाठीतरी खास आहोत या विचारानेच मन भारावून जाते। कदाचित सगळ्यांबरोबर काहीसे असेच होते...... 

प्रेमासाठी जगताना जगण्याची 
परिभाषा बदलून जाते,
नव्याने आपल्याला  नकळत,
आपली ओळख होते..

आपलेसे भेटते कोणीतरी जेव्हा
 नियमांचे गणित चुकते,
अवघडही  होऊन जाते सोप्पे 
 विचारांची दिशा बदलते..

कवी कल्पनांचे विश्व सारे,
हळू-हळू आपलेसे होऊन जाते,
 चांदण्या-दवबिंदू-रंग फुलांचे,
अजूनच मोहक रूप घेते...

किती सांगावे किती बोलावे,
भान अनेकदा हरपून जाते,
प्रेमात पडल्यावर कळते,
जीवन किती सुंदर असते.

जस-जशी लग्नाची तारीख जवळ येते तशी मनाला नव्या नात्यांची ओढ लागते. इतके दिवस पाहिलेल्या स्वप्नांना साकारताना काही वेगळेच सुख मिळते. लग्नाची धावपळ संपते आणि आई-बाबांना निरोप देताना मन गोंधळून जाते.सगळे आपल्याला आधीपासून माहित असते पण तरीही काही प्रश्नांची उगीच मनात लुडबुड सुरु होते। काही दिवसांनी मनाची गाडी रुळावर येते।लग्नाआधीच्या जादूमयी दुनियेमध्ये आता कुकरची शिट्टी वाजते, सामानाची यादी असते,पाहुण्यांची ये-जा असते. जादूमयी दुनियेतील राजकुमारी आता कोणाची सून असते, कोणाची वहिनी असते. लग्नाआधी ताई म्हणून हाक मारणारी चिमुकली मंडळी आता काकू म्हणून हाक मारतात. घरी पोळीचे नकाशे बाबा वाह! म्हणत खात असतात पण तोच भूगोल लग्नानंतर गोल करावाच लागतो।  लग्नाची हीच मजा आहे. आपण असेही वागू शकतो याचे  मलाच कधी कधी आश्चर्य वाटते।
लग्नाआधी मनाला जाणणारा मित्र आणि लग्नानंतर मनापासून प्रेम करणारा जीवन-सहप्रवासी म्हणून हातात हात घेणार्या नवर्याशी मैत्री अजून धृढ होते .नवरा-बायको मधील भांडणांची मजा काही औरच असते :).
 सुख कशाला म्हणायचे आणि समाधानाची वाख्या आपल्याच हातामध्ये असते हे लग्नानंतर अनुभवातून कळते। लग्नाआधीचे आणि नंतरचे प्रेम तेच असते पण एकमेकांना जाणून घेताना ते अजून परीक्व होत जाते.
 
मंगल समयी सनई चौघडे,
सौभाग्याचे क्षण घेऊन आले 
अक्षदांच्या कणा-कणातुन,
शुभ आशीर्वाद लाभले 

पदरात लपवून माहेरचा ओलावा,
नव्या दिशांकडे चालली पाऊले
ओलांडले माप उंबरठ्यावरील,
नवीन नात्यांशी नाते जुळले 

नवीन जगात हरवल्यावर,
संस्कारांची गुरुकिल्ली कामी येते,
' प्रेमाने जग जिंकता येते ',
आईची शिकवण अनुभवातून पटते..


संसाराची न वाख्या असते,
कदाचित शब्दांच्या पलीकडे काही असते,
तुझे माझे म्हणता म्हणता,
आपलेसे जग होऊन जाते..

 लग्नाच्या 6 महिन्यान नंतर लिहिलेला हा blog काही अनुभवांनी सम्पूर्ण नसेलही..पण कदाचित लग्नाचे असेच असते।.वेगळे वेगळे म्हंटले तरी तुमचे माझे same  असते :)


Saturday, May 19, 2012

वाऱ्यावरील सफर


Mauritius ला जाताना मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती- आकाशामध्ये उडण्याची-Sky diving ची !  आज-उद्या  म्हणत म्हणत तो दिवस उगवला ज्याची मी इतके दिवस स्वप्ने पहिली होती.Sky diving च्या office मध्ये पोहचेपर्यंत मनात हजार विचार येऊन गेले. एकिकडे आकाशात उंच उडायची उत्सुकता होती तर दुसरीकडे १०,००० फूट म्हणजे किती मजली उंच इमारत याची कल्पना मनाला दोन पाऊले मागे जायला सांगत होती! या सगळ्या विचारांच्या गर्दीमध्ये आम्ही office मध्ये कधी येऊन  पोहचलो हे कळलेच नाही.
skydiving करायच्या आधी काही forms भरून घेतले जातात. 'तुम्ही आकाशातून उडी मारायचं शहाणपण करताय पण यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकतो याचे तुम्हास भान आहे. तुम्हाला काही झाल्यास मंडळ जवाबदारी घेणार नाही. स्वत:ची जवाबदारी घेण्या इतपत तुम्ही सज्ञान आहात. धन्यवाद!'  याच अर्थाचे इंग्रजी भाषेमधील दोन-तीन उतारे वाचले आणि संमती देत form वर सही केली. सही करताना मी आणि अपूर्वने एकाच वेळी एकमेकांकडे पहिले आणि एक हसू गालावर उमटले. ते हसू आणि त्यामागील विचार कदाचित शब्दामध्ये बांधता येणार नाहीत...
 form भरून झाल्यावर आम्हाला आमच्या प्रशिक्षकांची ओळख करून देण्यात आली. .आम्हाला वाटले कि चांगले ३०-३५ मिनिटे प्रशिक्षण चालेल पण इथे तर २-३ मिनिटांमध्येच सगळे आटोपले. आम्हाला jumping suit चढवण्यात आले आणि पुढे काय काय घडणार आहे यादिशेने मन धावायला लागले..एक छोटेसे विमान आमची वाट बघत होते.आम्ही विमानात बसलो. दारातून भरदाव एकू येणाऱ्या वार्याची गती आणि माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती एकाच लयात चालत असावी..
विमानाच्या खिडकीमधून खाली डोकावून पहिले आणि वाह! याशिवाय काही शब्द सापडले नाहीत. किती सुंदर दृश्य होते ते..समुद्र असा दूरवर पसरला होता तो निळ्या रंगाच्या अनेक छटा घेऊन..मोराने आनदाने नाचत पिसारा फुलवावा आणि निळ्या, हिरव्या ,सोनेरी रंगाची उधळण करावी तसेच काहीसे रंग इथे दिसत होते..अनेक रंग लाटांवर घेत समुद्र येतो आणि सारे रंग धरणीवर मनसोक्त उधळतो..रुपेरी वाळूतून पुन्हा परत जातो आणि अजून निळाशार होत क्षितिजापाशी आकाशाला जणू भिडतो..समुद्र किनारा देखील किती मोहक आकारामध्ये दूरवर पसरला होता..असे वाटत होते कोणीतरी खूप मनापासून रुपेरी वाळूवर मुक्त रेघा कोरल्या आहेत.. जमिनीला हिरव्यागार शेतांनी झाकून टाकले होते..नागमोडी करड्या, काळ्या रंगाचे रस्ते वाट काढीत होते..दुसर्या बाजूला रिकाम्या मैदानावर सुंदर घरांची वस्ती उठून दिसत होती..नजर जिकडे फिरवावी तिकडे रंग, आकार, आवाज आणि कल्पनेच्या बाहेर मनाला मोहून टाकणारी दुनिया होती..मी यात स्वत:ला विसरून गेले होते 
विमान थोड्या अजून उंचीवर गेले आणि खालील सारे दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे दिसायला लागले. मी माझ्या instructor बरोबर चर्चा केली तर समजले कि आम्ही फ़क़्त १००० फूट वर पोहोचलेलो आहोत..मनातील भीती एव्हाना गायब झाली होती आणि उंची वाढेल तशी हे सुंदर चित्र कसे अप्रतिम होत जाईल याची उत्सुकता वाढत होती..बघता बघता आम्ही ढगांच्याही वर आलो.जमिनीवरून गुबगुबीत दिसणारे आणि सूर्याबरोबर लपछपी करणारे हे ढग जवळून तेवढेच लोभस दिसत होते.असे वाटत होते कि काश या ढगांवरून मस्त सैर करता आली असती. ढगांची कधी चपळ तर कधी संथ हालचाल जमिनीवर आपल्या सावलीबरोबर जणू खेळ खेळत होती.ते बदलणारे दृश्य माझ्या मनाचे वय अजून लहान करत होते आणि त्याच्या मागे धावत होते.
 
काही वेळाने बंद केलेले विमानाचे दार पुन्हा उघडण्यात आले. आमच्या instructor ने सांगितले कि आता आपण उडी मारायची आहे सगळ्या सूचना लक्षात ठेवा.हे एकून मनामध्ये काय सूचना सांगितल्या होत्या याची checklist चालू झाली.अजून मी शेवटच्या check point पर्यंत पोहचातीय तो पर्यंत मी विमानाच्या दारात होते आणखीन काही विचार करायच्या आधी हवेमध्ये पोहोचले होते. काही सेकंद समजलेच नाही कि हे काय घडतंय. ताशी २०० km च्या वेगाने आम्ही जमिनेकडे झेप घेत होतो.सारे अवती भोवती गोल गोल फिरत होते, वेग आणि आवाज याशिवाय काहीच दिसत नव्हते, ओळखीचे वाटत नव्हते.काही क्षण वाटले झाले आता अश्या स्वत:भोवती प्रदिक्षिणा घालत आपण जमिनीमध्ये वेगाने आपला झेंडा गाढणार! पण अचानक गती कमी झाली आणि सारे काही शांत झाले.इतके शांत कि माझ्या हृदयातील ठोकेही मला एकू येत होते.काही क्षणपुर्वी वाटलेली भीती मनाचा पोरखेळ वाटत होता.जे दृश्य विमानात बसून पहिले त्याचा जणू काही मी हिस्सा बनतीय असे वाटू लागले. समुद्राचे रंग अजून मोहक होऊ लागले..रस्ते , नागमोडी वाट, हिरवीगार शेते, बसकी घरे, उंच इमारती सारे सारे काही आपलेसे वाटायला लागले.
  

पक्षी आकाशात उडतात तेह्वा त्यांना किती मजा येत असेल याची कल्पना या अनुउभावातून आली.. न कसले traffic न कसली धावपळ! आपल्या उंची पासून खूप उंचावरून जग पाहताना  जाणवते कि किती छोटे आहोत आपण. असे गंभीर विचार डोक्यात येत असतानाच पक्ष्याप्रमाणे आम्ही घिरट्या घेऊ लागलो. आमची वर्यावरील सफर अजून मजेशीर होत गेली ती parachute बरोबर केलेल्या खेळामुळे. ४-५ मिनिट आकाशात होते तेव्हा वाटले अजून थोडा वेळ म्हणत म्हणत इथेच दिवसाची संध्याकाळ होताना पहावी..अजून किती रंग, किती गोष्टी या आकाशापाशी आहेत याची जवळून ओळख करून घ्यावी. बघता बघता वेग कमी होत गेला आणि आम्ही जमिनीवर येऊन पोहोचलो ते आयुष्यभर मनात कायम राहतील अश्या आठवणींना घेऊन.