Monday, September 20, 2010

तो आणि ती

दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा हिरव्या रंगात भिजल्या होत्या, पावसाचे थेम्ब गुबगुबीत ढगांना गुदगुल्या करत दरया-खोरयातुन झरा बनुन नदीत लीन होत होते. नजर फिरवावी तिकडे निसर्ग बहरला होता ....
हिरव्यागार नदीच्या काठाशी ती गाणी गुणगुणत होती. काठाशी असलेले गोल-गरगरीत खड़े पाण्यात टाकुन त्याच्या भोवती तयार झालेल्या तरंगामध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद...आजही ती त्या जल-तरंगांमध्ये बुडून गेली होती, तेवढ्यात गुलाबी-लाल-नारंगी फुले तिच्यावर बरसली..तिने दचकून मागे पहिल आणि निरागसताही लाजावी इतक गोड हसली..
पाण्यात स्वत:च प्रतिबिम्ब पहाव तसा तोही तिच्याकड़े बघून हसला...
"काय लपवत आहेस मागे ?" तिने त्याच्या हाताकडे बघत विचारले
त्याने हातातील रानफुलांची परडी तिच्या तळहातावर अलगद ठेवली...नाजुक वेली पासून बनवलेला मुकुट तिला बहाल केला आणि त्रिवार मुजरा करत म्हणाला "राणी-सरकार नाचीजकडुन ही छोटीशी भेट."
तिने एका फुलाला केसात माळले आणि हसू गालात लपवून म्हणाली " कोण आहे तिकडे? या कलाकाराला चार सुवर्ण मुद्रा इनाम म्हणून देण्यात याव्यात "
त्यानेही काठावरील चार शिम्पले वेचले आणि "राणी सरकारांचा विजय असो" अश्या घोषणा देत तिच्या शेजारी येउन बसला.
"सोन्याचा चौरंग, त्यावर नक्षी छान,
चांदीचा कलश शोभे त्यावरी , त्यात सोनेरी पान,
शेजारी बाप्पा, त्याचा प्रथम मान ,
नाव घेते यांचे ,हे आहेत सर्वात गुणवान"

शब्दात
उगीचच लय बांधत तो तिच्या कानामध्ये गुण-गुणला
"गृह-प्रवेश करताना काय सही उखाणा घेतला होतास तु!"
"पुरे! एवढी चेष्टा करायची काही गरज नाही "तिने गाल फुगवून त्याला सांगितल
"आता होत अस कधी कधी...एक तर सगळ्यान्नी एवढे उखाणे सांगितले होते की मी आधीच पाठांतर करून हैराण झाले होते..त्यात तुझ नाव कोणत्या यमक मध्ये बसेल तर खर...तुझ्या घरात एवढी माणसे जमली होती मला पहायला की मी सगळ विसरुनच गेले.मग काय २-३ उखाणे जोडले आणि एकदाच घेउन टाकल तुझ नाव! जरा यमक चुकलच पण नंतर काय सुरेख नाव घेतल मी.हो ना? "
"हो ग... मी आपला सहजच तुझी मजा करतोय"अस बोलता बोलता त्याने तिचा हात हातात धरला.तिच्या काळ्याभोर डोळ्यात पहात तिला म्हणाला
"वहीच्या पहिल्या पानावर आपण श्री-गणेशा लिहितो आणि एक एक पान उलटत वही कधी संपुन जाते ते कळत नाही..परत नविन वही नवा गणवेश, पण पहिल्यांदा पाटीवर गिरवलेल्या श्री-गणेशा नेहमीच मनाजवळ असतो.तुला पहिल्यांदा मी पाहिल होत तो दिवस तसाच काहीसा माझ्या मनामध्ये कोरला गेला आहे..माझ्या नविन आयुष्याचा श्री-गणेशा!
काका-काकू-मामा-मामी-लहान-मोठे सगळ कुटुंब आणि त्यात हरवलेली लाजत खाली मान घालून ती हळूच
माझ्याकडे नजर वर करून पहात आहे, तिची नजर वर उठते आणि मला पाहून परत ती पापण्यांची उगीचच उघड झाप करते.. मी अस स्वप्न वधुपरीक्षेचे पहिल होत..
पण तुला भेटायला आलो आणि तू माझ्या डोळ्यांमध्ये थेट पाहिलस...."मला स्वयंपाक जमत नाही, तुम्हाला जमातो का?" हा तुझा प्रश्न माझ्या सरावातला नह्वता.. मी उगीचच हसलो आणि विषय बदलला...तु बोलत होतीस आणि मी फक्त मान डोलवुन हो-नाही एवढच सांगत होतो.. तुझ्या त्या प्रश्नातील निरागसता तू अजुनही तुझ्या हसण्यामधुन जपली आहेस..तुझ्या असण्यानेच माझ्या आयुष्याला अर्थ आहे...ही प्रेमाची साथ अशीच देशील ना जन्मो-जन्मी!"
"बास आता खुप झाल ....इतक कौतुक करू नकोस एकाच दिवशी" तिने डोळ्यातील पाणी लपवत विषय बदलला....
"आता तू डोळे बंद कर"
उबदार शाल त्याच्या खांद्यावर पांघरत तीने त्याला डोळे उघडायला सांगितले
"लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा त्या निसर्गाच्या कवेत जुन्या आठवणी बरोबर ते गुंग होऊन गेले..

इतका वेळ झाडामागे लपलेली लहान मुले " लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी-आजोबा" म्हणून त्यांच्याकड़े धावत आली...
"तो आणि ती" आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या परिवारा बरोबर रमून गेले... पुन्हा एकदा आयुष्यातील एक दिवस नव्याने जगण्यासाठी.....