Tuesday, November 1, 2011

चि.सौ.कां.

लोक म्हणतात कि या जगात ३-४  ऋतू आहेत. पण मी म्हणेन या आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन ऋतू घेऊन येतो. मिनिट, दिवस,महिने आणि वर्षे पुढे जातात आणि आयुष्य घडत जाते.कधी दिवस मन-मुराद हसवून जातो तर कधी रुसतो,रडतो,चिडतो,उदास होतो आणि परत नवीन जोश घेऊन उगवतो..हे सगळे भाव-विश्वातील ऋतू ! आता आताशा काही जास्तच मला समजू लागले आहेत!

शाळेमध्ये होते तेह्वा परीक्षेचा निकाल याशिवाय मी फक्त आईलाच घाबरायचे. तिची शिस्त, पद्धतशीरपणा आणि सारख्या सूचना! पण या सगळ्यातून बाबा आम्हाला सही बाहेर काढ्याचे.आईचा ओरडा बसू नये म्हणून कधी कधी आमच्या बरोबर तेही लहान होऊन जात असत.दहावीच्या सगळ्या पेपरना बाबा आम्हाला सोडायला येत असत आणि मग पेपर सुटला कि आम्हाला काही तरी खाऊ देत असत.नकळत बाबा आणि आम्हा भावंडांची दोस्ती वाढत गेली,बाबा आमचे दोस्त झाले. लहानपणी बाबांनी कधी रागावले आहे असे प्रसंग फारच कमी.आई चा दरारा मात्र बापरे!आभ्यास नाही केला तर मला आई अगदी स्वप्नात येऊन सुद्धा रागवायची !

दिवस सरले आणि आई-बाबांच्या चिमुकल्या चिमण्यांचे घरटे सोडायचे दिवस आले. आपले लग्न ठरावे आणि देवाने आपल्यासाठी निवडलेला राजकुमार आपल्याला त्याच्या जादूमय दुनियेत घेऊन जावा असे स्वप्न कोण मुलगी पहात नसेल. मीही माझ्या लग्नाची अनेक स्वप्ने पाहिली होती. ज्यावेळी माझ्या भावी जीवन-साथीदाराशी ओळख झाली त्या क्षणी आयुष्य गुलाबी आणि नवीन स्वप्नांनी बहरून गेले. नवीन दिवस नव्या गोष्टी. रोज एक-मेकांच्या आयुष्यातील नवीन पैलू जाणून घेता घेता लग्नाची तारीख जवळ आली.आता काय लग्नाची खरेदी,धावपळ,गडबड,उत्साह आणि हजारो कामांच्या याद्या! इतके वर्ष लग्न ठरेल तर हे करेन नि ते करेन म्हणून तयार केलेली मनातील यादी सत्यात उतरवताना चांगलीच धावपळ होत आहे.

आज सहज खिडकीतून दिसणाऱ्या काळ्याभोर आकाशाकडे पहिले. कित्येक वेळा याच आकाशात मी माझी स्वप्ने लिहिली होती.चांदण्या मोजता मोजता माझे बालपण पुन्हा जगले होते.आज परत आठवणींशी पडताळा केला आणि डोळ्यात टचकन पाणी आले.दिनदर्शिकेवर माझ्या लग्नाची तारीख शोधताना जुन्या दिवसांवरील मारलेल्या खुणा आता नकोश्या वाटत आहेत . ४-५ महिन्यांपूर्वी कधी हे दिवस सरतील आणि कधी तो आयुष्यातील महत्वाचा दिवस उगवेल याची मी किती आतुरतेने वाट पहिली होती. पण ते दिवस थोड्याफार फरकाने परत जगावेसे वाटत आहेत .आईची शिस्त आणि पद्धतशीर पणा याची बोलणी कमी आणि तिने कित्येकदा मायेने मारलेली हाक आठवत आहे. मी आजही आईशी भांडले पण नेहमीप्रमाणे तिच्यावर चिडू नाही शकले. आज काल माहेर आणि सासर यातील रेषा फार धूसर होत आहे कारण सासू-सासरे सुनेला मुली सारखे वागवतात.पण तरीही आईशी भांडून नंतर तिला मारलेला मस्का,तिच्या कडे केलेले हट्ट, दर वाढ-दिवसाला तिने केलेले औक्षण आणि जगाला आपण कसेही दिसत असलो तरी तिने हजार वेळा आपल्याला नजर लागू नये म्हणून मायेने फिरवलेला हात. परीक्षेवेळी आपल्यासाठी बोललेले नवस असोत वा करडो शब्दांनी आपल्यामागे केलेले कौतुक.आज जाणवतंय कि लहानपणी आई रागावली नसती तर मी आयुष्यात जे काही आहे ते बनू शकले नसते. आई-बाबा खरच खूप वेगळे असतात.ते मुलांसाठी जे करतात ते कदाचित १००% समजणे फार कठीण असते.आज मनापासून असे वाटत आहे कि माझ्याकडून जे काही कटू शब्द माझ्याही न-कळत आई-बाबांना मनाला लागले असतील ते क्षण भरून निघावेत!

आज नव्या आयुष्याची स्वप्ने पाहताना एक पापणी सुखी संसाराची स्वप्न पाहतीय तर एक पाणावली आहे. आज मनात चालणाऱ्या या वादळाने मला बरेच काही उलगडून सांगितले आहे . चि.सौ.कां. या गोंडस नावाच्या टप्प्या पर्यंत येताना 'सौ' च्या अलीकडे असणाऱ्या आई-बाबांच्या 'चि.'मुलीने  लाग्नाच्या पलीकडील  सौभाग्याचे 'कान्क्षण' पूर्णत्वाला नेताना बरेच काही शिकायचे असते. आपल्या घरातील उंबरठा ओलांडताना आई-बाबांनी दिलेल्या प्रेमाची आणि संस्कारांची खूप प्रकर्षाने जाणीव होते. जे त्यांनी दिले त्याहून कित्तेक पटीने त्यांना आपण देणे लागतो याची मनाला जाणीव होते. कधी काळी दूर स्वप्नात रमलेल्या मनाला यातून नवीन शिकायला मिळते आणि आपण आता फक्त आई-बाबांची लाडकी मुलगी नसून नवीन आयुष्यात नवीन नात्यांशी जोडले जाणार आहोत या सत्याशी परत नव्याने ओळख होते...

लग्न पहावे करून! या उक्तीनुसार माहेरचे संस्कार घेऊन सासरी नवीन नात्यांना आपुलकीचा ओलावा आणि सुखाचे मोती देऊ इच्छीणाऱ्या मला-' चि.सौ.कां.' ला आज माझीच नव्याने ओळख होत आहे. आयुष्यातील या नवीन वाटेवर मला तुमच्या सदिच्छा नक्की द्या! 


Thursday, August 4, 2011

क्षणभर विश्रांती भाग-3

मस्त उसळणाऱ्या लाटा, सुंदर समुद्र किनारा, गार सुखद वारा आणि पायाखालून हळुवार सरकणारी वाळू..अश्या  वातावरणामध्ये कोणाला मन चिंब भिजून जाईपर्यंत पाण्यात रहावेसे नाही वाटणार! पण आमची चिमुकली गार्गी तिला समुद्राचे पाणी बघून डोळ्यात पाणी दाटून येत होते..तिच्यासाठी प्रकाश पाण्याबाहेर राहून जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या साऱ्या सजीव, निर्जीव जीवांचे फोटो काढत होता..आम्हाला या सर्वाची जाणीव खूप उशिरा झाली. 

आम्ही सारे मस्त पाण्यामध्ये खेळ खेळत होतो..लोक जास्तीत जास्त काय एक मेकांवर पाणी उडवतात, लाटांवर उड्या मारतात पण असे साधे खेळ खेळले तर आम्ही कसे..काही तरी बिलंदर करायलाच हवे! यावेळी स्नेहा चा उत्साह लाटांच्याहि पुढे धावत होता..आणि धावत धावत तो धपकन पाण्यात पडला..त्याच्या तळा -गाळाशी गेला आणि तिथून ओल्या मऊ वळूला घेऊन आला..आता हे असे वर्णन का? हो ना? काही नाही स्नेहाला हा खेळ सुचला कसा असेल याचा विचार करत होते आणि हे सगळे वाटले..हा तर स्नेहाने सुचवलेला खेळ असा होता कि हातामध्ये मावेल इतकी चिखल वाळू घ्यायची आणि नेम लागला तर नेम धरून नाहीतर अशीच समोरच्याचा अंगावर रंग उधळतो तशी फेकायची! बर तसं पाण्यात गेल्यावर आपण ओले होतो हे मला माहित होते..पण बुद्धी ओली होते आणि आपण असे खेळ हि मजेत खेळून जातो याबद्दल आता कोरडे छान  राहून मला बोलायला खूप मजा वाटतीय..पण तेह्वा स्नेहा च्या कृपेने आम्ही वाळूमय होऊन गेलेलो होतो..

अनिकेत तसा शांतहि राहू शकतो या न पटणार्या सत्याशी सामोरे आम्ही इथेच गेलो..अनिकेत चा अगदीच खोया खोया चंद झाला होता आणि तो (बहुतेक) लाडक्या व्यक्तीच्या विचारांमध्ये सारे जग विसरून समुद्र किनारी निर्विकार पणे उभा होता.. सामाजिक कामे करण्याची त्याची तयारी मात्र कौतुक करण्यासारखी होती.. आम्ही बापडे पोहता येत नाही म्हणून चार पाऊले चालून पाण्यात जायचो..लाटेवर खेळायचो आणि मोठ्ठी लाट आली कि स्थलांतर! मग अनिकेत आला आणि त्याने एकेकाला अगदी लाट मनाला भिडे पर्यंत समुद्रात आत घेऊन गेला..तेह्वा जाणवले केवढी प्रचंड ताकद आहे या उसळणार्या लाटांमध्ये..लाट आमच्याकडे धाऊन यायची आणि मागे ढकलून द्यायची...परत समुद्राच्या कुशीत सामावताना पायाखालील वाळू आपल्याबरोबर घेऊन जायची..तेह्वा क्षणभर वाटायचे कि जणू कणा-कणाने आपण समुद्राकडे खेचले जातोय..नुसता किनार्यावरून फेसाळणारा समुद्र आपल्या आत किती काही दडवून असेल असे वाटून गेले!

वेदिकाने तसा पहिल्यांदा समुद्र किनारा पाहिला नव्हता  पण स्वारी ख़ुशी होती..पाण्यात भिजत भिजत लाटेनेच आमची एकदा मजा केली..आमचा अंदाज चुकवत तिने समुद्रातून वर खाली असे छान बुडविले..सेकंदभरात लाट डोक्यावरून गेली आणि समुद्राचे पाणी किती खरे असते याची चव समजली..मग मात्र  वेदिकाची किनार्यावर परतावणी झाली आणि ती गार्गी टीम मध्ये शामिल झाली..तिला सोडायला मी जेह्वा परत गेले तेह्वा मला प्रकाशचे काय चालले आहे हे दिसून आले..येणारी लाट, जाणारी लाट, पोहणारी वाळू, समुद्रात वाहत जाणारी वाळू, ओला शिंपला, कोरडा शिंपला, भांडणारी कुत्री, हसणारे आम्ही, समुद्रात लाल प्रकाशाचे किरण उधळत हसणारा सूर्य आणि आमच्या चपला सुद्धा! प्रकाशला  हे सगळे काही कॅमेरा मध्ये सामावून घेण्याचा छंद जडला होता!



मग मी हि विचार केला आपण का मागे राहावे..मी पण कॅमेरा काढला आणि भन्नाट फोटो काढले..अरे हो यात सगळ्यात अमोल काय काय करत होता हे सांगितले नाही ना मी..त्याचा काय झाले अनिकेतचा तर झाला होता ओला खडू म्हणून अमोलहि सैर-भैर वार्याप्रमाणे आपली नजर फिरवत उभा होता..जिथे कमी तिथे आम्ही या तत्वाने तो मला आणि स्नेहाला शिंपले गोळा करायला मदत करत होता..
सगळे वाळूवर आपापली नावे कोरत असताना मी आपली वाळूचा किल्ला (डोंगर बहुतेक ) रचत होते..वेदिका आणि मी आमच्या पाऊल खुणांचे ठसे बघत किनार्यावर मुक्त धावत होतो..अमोल आणि स्नेहा मात्र काहीतरी गंभीर विषयावर बोलत होते..तेवढ्यात किनार्यावरून धावणारी बैलगाडी दिसली...काय सही वाटला आम्हाला..चला घोडागाडी  नाही पण कमीत कमी बैलगाडी  तरी दिसली  !

इतका वेळ मनाशी बांधून ठेवलेला उत्साह आता मावळणार्या सूर्याबरोबर कमी होत होता..परत वाडीमधून मार्ग काढत जावे लागणार  म्हणून समुद्राच्या त्या रंगे-बी-रंगी रुपाला डोळ्यात साठवून आम्ही आमच्या रूमवर परतलो.. 


Wednesday, August 3, 2011

क्षणभर विश्रांती भाग-२

रूम वर पोहोचलो आणि जणू प्रवासाचा थकवा कुठे पळून गेला..संथ गार वार्यावर  झुलणारा दरातील झोका पाहिला आणि पावलाने त्या निवांत क्षणांची वाट निवडली...रोजच्या धावत्या आयुष्यात कधी प्रवासाची कसरत तर कधी ऑफिसमधील कटकट! घड्याळाचे काटे पुढे पळत असतात आणि आपण त्याचे मागे धावत असतो...तासा-तासांनी दिवस संपून जातो आणि मन तरीही अजून काही नवे , सुखाचे क्षण शोधत असते...पण इथे आलो आणि या निवांत क्षणांमध्ये मन जणू विरघळून गेले..संथ पाण्यामध्ये कागदाची नाव कशी अलगद तरंगत असते तसे वाटले मन जणू या क्षणांवर आरामात पहुडले आहे..

 

आमच्या बरोबर आलेली बच्चे कंपनी तर जाम खुश होती..झोका , आंब्याची झाडे, केळीची हिरवीगार झाडे आणि  या झाडावरून त्या झाडावर दुडू दुडू पळणारी खारुताई..एक नजर या सगळ्याकडे पहावे आणि एक नजर या चिमुकल्यांच्या निरागस डोळ्यांमध्ये..किती तो आनंद , आश्चर्य इवल्याश्या डोळ्यांमध्ये तरळत होता! हसत गप्पा मारत आम्ही सारे त्या झोक्याच्या अवती भोवती थांबलेलो होतो..घरासमोर एक काळभोर रस्ता कधीतरी धावणाऱ्या वाहनांची वाट बघत होता..३०-35 मिनिटांनी एखादी गाडी भरदाव धावायची..हा रस्ता ओलांडला कि समोर आमच्या घर-मालकाचे घर होते..तिकडे आमची जेवायची सोय करण्यात आली होती..
झोक्यापाशी काहीवेळ रेंगाळल्यावर आम्ही सगळे जरा टवटवीत झालो..मस्त जेवलो आणि स्वस्थ एक वामकुक्षी घेतली..हो पण त्याआधी आम्ही गावाची एक चक्कर मारली हे सांगायचे राहून गेले..निवांत काळ्याभोर रत्यावर दुपारच्या चांदण्यांमध्ये आम्ही आमच्या पाउलांची हजेरी लावत फिरत होतो...दुपाराचीच वेळ असल्याने रस्त्यावर शुक-शुकाट होता..तसही भर गडबडीच्या वेळी पण या रस्त्याचा जीव गुदमरून जाईल अशी गर्दी कधी इथे होत नसावी..पुण्यातील रस्त्यांना नक्कीच या रस्त्याचा हेवा वाटेल! असो..इकडे गावामध्ये छान बसकी घरे आहेत काही आधुनिक काळाप्रमाणे बदलेली पण घरे आहेत..पण प्रत्येक घरात एक झोका नक्की असावा कारण मी जितक्या घरांमध्ये डोकावून पाहत होते तितके झोके दिसत होते..अरे हो या सगळ्यात एका साथीदाराची आठवण करून द्यायचीच राहिली.. श्री. भूभू श्वर अर्थातच बोली भाषेतील कुत्रा! याला आमच्या बच्चे कंपनी वर विशेष प्रेम असावे तो गावभर आमच्या मागे मागे फिरत होता..इतका कि देवळात गेलो तरी दर्शनासाठी हजर होता..देऊळ छान होते..इकडे प्रत्येक वास्तू च्या मागे एक सुपारीची बाग असते..या बागेमधून निघणार्या वाटेवर चालत गेलो कि मातीने पाऊल वाट सुरु होते आणि मग हळू हळू पांढरी वाळू वाट मऊ-भुसभुशीत करते..या वाटेवर पक्षांचा आवाज, पानांचा आवाज येतो पण जसा जसा समुद्र किनारा जवळ येतो तसा समुद्राच्या लाटांचा वाढत जाणारा आवाज शब्दात नाही पण मनात साठवाण्यासारखा असतो..



आम्ही पण अश्याच वाटेवरून समुद्र किनार्यावर पोहोचलो..आधी डोंगरावरून पाहिलेला समुद्र किनारा जवळून इतका सुंदर, मोहक दिसत होता कि आपल्या वयाचा, वेळेचा जणू काही विसर पडून जावा..मस्त त्या लाटांवर खेळावे एवेढेच काही आम्हाला सुचत होते..मग काय मस्त पाण्यामध्ये खेळायला सुरुवात केली..


Sunday, April 24, 2011

क्षणभर विश्रांती- भाग-१

ठिकाण : conference room 
वेळ : दुपारी २:३०
साधारण ४-५ माणसांचा थवा संशयास्पद हातवारे करत काहीतरी गहन चर्चेमध्ये बुडून गेला होता....तेवढ्यात त्यातील एकाने speaker phone वरून कोणालातरी फोन लावला...दूरध्वनी ची कर्कश्य रिंग वाजली आणि तिकडून आवाज आला........

व्यक्ती १: नमस्कार 
व्यक्ती २: काय करतोयस?
व्यक्ती १ : काही नाही..आपण कोण?
व्यक्ती २ : मग ये conference room मध्ये...
व्यक्ती १ : का?
व्यक्ती २: काही खास बोलायचे आहे....लवकर ये!

अतिशय गंभीर चेहरा करून व्यक्ती १ conference room मध्ये पोहचली आणि.......सगळे जोरात हसायला लागले...अनिकेतला (व्यक्ती १) काही सेकंद काहीच झेपले नाही. चेहऱ्यावरील एकही रेष हलू न देत तो खुर्चीवर बसला आणि समोरील हसणारे चेहरे पाहून विचारू लागला..."स्नेहा (व्यक्ती २) कश्याला बोलावले मला?" 

"अरे असेच बोलावले तुला..आम्हाला खूप कंटाळा आला आहे office च्या routine चा म्हणून सगळे एकत्र येऊन ट्रीप प्लान करतोय..तू येणार आहेस का?"

अनिकेत तसा आमच्या सगळ्यांमध्ये नवा होता..या ऑफिस मधील त्याच्या अनुभवाच्या पुढे आम्ही सगळेच त्याला senior होतो...आमचा असा नवा चेहरा बघून अनिकेत फारच चकित झाला असावा..असा ट्रीप साठी conference room मध्ये जमा होणे आणि गंभीर चेहऱ्याने विनोद करत ट्रीप ची चर्चा करणे..हे त्याला नवीन असावे बहुतेक..

पण म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण...तिथे conference room मध्ये जमलेल्या प्रत्येकाची मनस्थिती काहीशी सारखीच होती...काम आणि काम! याच्या पलीकडे स्वत:साठी आपल्या कुटुंबासाठी वेळ चोरावा लागत होता! 

स्नेहा आणि अमोल एकाच बोटीमध्ये सवार होते..पण त्यांची बोट कोणीतरी तिसरेच लोक चालवत होते..यांनी पूर्व म्हटले कि यांची बोट दक्षिणेला वळली म्हणून समजा! :-)

दिनेश आणि सौ.दिनेश पुणे दर्शन करून झाले म्हणून आता महाराष्ट्र दर्शन साठी सज्ज झाले होते...तेवढेच नव्याने एकमेकांना ओळखण्यासाठी हे नवीन जोडपे तयार होते.. 

प्रकाश खूप दिवसांनी (वर्षांनी ?) काम आले म्हणून कंटाळला होता..मी बरेच दिवस खूप काम करून कंटाळले होते. एकदा सहज गप्पा मारताना प्रकाशने त्याच्या गावी जायचा का ट्रीपला? असा विषय काढला. "माझे गाव छान आहे मस्त समुद्रकिनारा आहे तिकडे..तसही मी दर शनिवारी-रविवारी जातोच तिकडे..माझ्या बायकोने संगीत नाटकामध्ये भाग घेतला आहे..त्याच्या तालमी सुरु आहेत सध्या." मला हा प्रस्ताव आवडला आणि आमची ट्रीप उत्सुक माणसांची जमवा-जमाव करायला सुरुवात झाली! 
त्यातील पहिला चर्चेचा पडाव म्हणजे आमची ही conference रूम मधील  सभा!

हा, तर वर सांगायचेच राहिले कि अनिकेतनेही लगेच होकार सांगितला. बहुमताने ट्रीपचे ठिकाण ठरले-आंजर्ले!

आमचे ट्रीप चे विचारांचे घोडे एकदाचे मैदानात उतरले..जगात असतील नसतील असे सगळे अडथळे आमच्या ट्रीपच्या मध्ये आले..कधी गाडीच नाही तर कधी ट्रीप मधील सभासद गायब! फ़क़्त मनाच्या इच्छाशक्तीने एकदाची ट्रीप ची तारीख ठरली. बाप्पा मोरया म्हणत २६ मार्च २०११ ला आमच्या गाडीची चाके आंजर्ले च्या दिशेने धाउ लागली.

तसे ऑफिसमध्ये आपण खूप गप्पा मारतो पण ट्रीप म्हणजे कशी धमाल हवी...म्हणून आमच्या बरोबर दोन खास व्यक्तींना आम्ही घेऊन चाललो होतो..त्या दोघी म्हणजे जणू  आमच्या दुनियेतील परी! जितक्या गोंडस तितक्याच हजार जवाबी! एक प्रकाश ची सुकन्या चि.गार्गी आणि दुसरी माझी भाची चि.वेदिका.



आमची गप्पांची गाडी तशी हळुच सुरु झाली.....अगदी सभ्यपणे आम्ही मुली विरुद्ध मुले अशी गाण्यांची अंताक्षरी सुरु केली..छान न्याहारी केली आणि गप्पांची गाडी सरळ ५ व्या गेअर मध्ये पाळायला लागली...शायरी, चारोळ्या, सुंदर किस्से, जुन्या आठवणी यांनी पुढचा प्रवास रंगतदार झाला..इतका वेळ शांत असणारी वेदिका आणि गार्गी एकदम रंगात आल्या...वेदिकाने मग तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले..मागील seat वर बसलेल्या अमोल आणि अनिकेत यांना नायकाचे चे काम दिले..तिच्या चित्रपटात नायिका नसल्याने मी आणि स्नेहा आनंदाने दोघांची तारेवरील कसरत बघत होतो..मग चित्रपट संपला आणि तिचा पाककृतीचा कार्यक्रम सुरु झाले..मला खात्री आहे अमोल आणि अनिकेत आयुष्यात एकदा तरी तिने शिकविलेले पदार्थ बनवण्याचं धाडस करतील ;-)
  गार्गी एकदम सही मूडमध्ये होती..ती आमच्या अंताक्षरी मध्ये कोणताही गाणे चालू असेल तरी त्याच लयात फ़क़्त एकच गाणं म्हणायची..."अग बाई sss ढग बाई sss"...आमचा एकवेळ ताल चुकेल पण तिचा गाणं अखंड चालू होते :-)...ती नवीन नवीन बोलायला शिकत होती म्हणून कि काय पण ती आपण बोलू ते वाक्य आहे तसा परत बोलायची... तिची आई पाणी पिणार असेल तर लगेच गार्गी म्हणायची.." गाडी थांबलीय गार्गी पाणी पिणार आहे" ...एवढे गोंडस, निरागस प्रवासी असतील तर कोणाला प्रवासाचा थकवा जाणवेल! :-)
 मागे एवढा दंग चालला होता तरी प्रकाश गंभीर चेहऱ्याने रस्ता-शोध मोहिमेमध्ये गुंग होता..त्याच्या भ्रमर-ध्वनी च्या सहाय्याने आम्ही आंजर्ले ला पोहोचलो..सगळ्यांनी समुद्रकिनारा दुरून पाहिला आणि "वाह" अशी दाद देत आम्ही आमच्या रूम वर पोहचलो.

Monday, January 10, 2011

काही ओळखीचे अनोळखी

नविन वर्ष सुरु झाले तेव्हा ठरवले होते रोज योग-साधना करायची.म्हणता-म्हणता ९-१० दिवस उलटून गेले आणि आज एकदा योगाचा श्रीगणेशा केला.शरीरात एवढी हाडे-अवयव फक्त योगासाठीच दिले आहेत या आवेशात केलेले योगाचे प्रकार आत्ता स्वस्थ बसल्यावर चांगलेच जाणवत आहे!
असो, शवासन या सुखद आसनासाठी गच्चीवर आम्ही सुस्त पडलो होतो. शामल-निळसर-धूसर थंडीमध्ये अशी संध्याकाळ चंद्रकोर घेउन नटली होती. थंडगार वारे चारही दिशांमध्ये बागडत होते.एक मऊ रजई अंगावर ओढावी आणि मस्त झोप काढावी असे वाटत होते.पण तेवढ्यात आकाशातील एक चांदणी लुक्लुकली.तिच्या शेजारी पाहिले तर सप्तरुशी समूह दिसला.लहानपणी आजोबा गच्चीवर घेउन गेले की या चांदण्यांची गोष्ट सांगायचे.कधी नक्षत्रांची रास तर कधी चंदोमामाची बात.मनाची अनेक कवाडे उघडली आणि मग काय चान्दोमामाच्या गावातून एक चक्कर झाली.घरी येताना मनात याच गोष्टी रेंगाळत होत्या।
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण किती सुन्दर गोष्टी सहज दुर्लक्षित करतो, असे वाटुन गेले.रत्यावर गाड़ी चालवताना संध्याकालची वेळ आहे, प्रचंड गर्दी अश्यवेली आपण किती चिडचिड करतो.पण कधी एक नजर वर करून त्या रोज नविन रूप घेउन येत असणाऱ्या चंद्राकड़े आपली नजर जात नाही.सकाळी रोज एकाच वाटेवर दिसणार्या मंदिरा समोरील सुगन्धित सुरेख फुलांनी सजवलेल्या दुकनान्कडे नजर फिरकत ही नाही.रोज ईमेल लिहिताना घरी काही जपून ठेवलेल्या पत्रांची,कविता-गोष्टीच्या पुस्तकांची आठवन येत नाही।
कधी जुने एल्बम काढून लहानपणीच्या दुनियेची सफ़र होत नाही.धूल खात पडलेल्या जुन्या फाइल मधील शालेय प्रशस्ति-पत्रकांची नुसती नंतर राद्दीच वाटते.पण खरतर किती आठवणी दडलेल्या असतात या मागे.
कदाचित यशामागे धावता धावता असे ओळखीचे अनेक जीवनाचे अनुभव कधी अनोळखी होतात हे कळतच नाही।
लोक म्हणतात इतिहासात जगु नये पण जगणारा प्रत्येक क्षण आज न उद्या जुना होणारच आहे।कधीतरी वेळ काढून मागे वळुन हेही पहाव की आपुल्या पाउलखुणान्नी किती रस्ते सजले आहेत.