लोक म्हणतात कि या जगात ३-४ ऋतू आहेत. पण मी म्हणेन या आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन ऋतू घेऊन येतो. मिनिट, दिवस,महिने आणि वर्षे पुढे जातात आणि आयुष्य घडत जाते.कधी दिवस मन-मुराद हसवून जातो तर कधी रुसतो,रडतो,चिडतो,उदास होतो आणि परत नवीन जोश घेऊन उगवतो..हे सगळे भाव-विश्वातील ऋतू ! आता आताशा काही जास्तच मला समजू लागले आहेत!
शाळेमध्ये होते तेह्वा परीक्षेचा निकाल याशिवाय मी फक्त आईलाच घाबरायचे. तिची शिस्त, पद्धतशीरपणा आणि सारख्या सूचना! पण या सगळ्यातून बाबा आम्हाला सही बाहेर काढ्याचे.आईचा ओरडा बसू नये म्हणून कधी कधी आमच्या बरोबर तेही लहान होऊन जात असत.दहावीच्या सगळ्या पेपरना बाबा आम्हाला सोडायला येत असत आणि मग पेपर सुटला कि आम्हाला काही तरी खाऊ देत असत.नकळत बाबा आणि आम्हा भावंडांची दोस्ती वाढत गेली,बाबा आमचे दोस्त झाले. लहानपणी बाबांनी कधी रागावले आहे असे प्रसंग फारच कमी.आई चा दरारा मात्र बापरे!आभ्यास नाही केला तर मला आई अगदी स्वप्नात येऊन सुद्धा रागवायची !
दिवस सरले आणि आई-बाबांच्या चिमुकल्या चिमण्यांचे घरटे सोडायचे दिवस आले. आपले लग्न ठरावे आणि देवाने आपल्यासाठी निवडलेला राजकुमार आपल्याला त्याच्या जादूमय दुनियेत घेऊन जावा असे स्वप्न कोण मुलगी पहात नसेल. मीही माझ्या लग्नाची अनेक स्वप्ने पाहिली होती. ज्यावेळी माझ्या भावी जीवन-साथीदाराशी ओळख झाली त्या क्षणी आयुष्य गुलाबी आणि नवीन स्वप्नांनी बहरून गेले. नवीन दिवस नव्या गोष्टी. रोज एक-मेकांच्या आयुष्यातील नवीन पैलू जाणून घेता घेता लग्नाची तारीख जवळ आली.आता काय लग्नाची खरेदी,धावपळ,गडबड,उत्साह आणि हजारो कामांच्या याद्या! इतके वर्ष लग्न ठरेल तर हे करेन नि ते करेन म्हणून तयार केलेली मनातील यादी सत्यात उतरवताना चांगलीच धावपळ होत आहे.
आज सहज खिडकीतून दिसणाऱ्या काळ्याभोर आकाशाकडे पहिले. कित्येक वेळा याच आकाशात मी माझी स्वप्ने लिहिली होती.चांदण्या मोजता मोजता माझे बालपण पुन्हा जगले होते.आज परत आठवणींशी पडताळा केला आणि डोळ्यात टचकन पाणी आले.दिनदर्शिकेवर माझ्या लग्नाची तारीख शोधताना जुन्या दिवसांवरील मारलेल्या खुणा आता नकोश्या वाटत आहेत . ४-५ महिन्यांपूर्वी कधी हे दिवस सरतील आणि कधी तो आयुष्यातील महत्वाचा दिवस उगवेल याची मी किती आतुरतेने वाट पहिली होती. पण ते दिवस थोड्याफार फरकाने परत जगावेसे वाटत आहेत .आईची शिस्त आणि पद्धतशीर पणा याची बोलणी कमी आणि तिने कित्येकदा मायेने मारलेली हाक आठवत आहे. मी आजही आईशी भांडले पण नेहमीप्रमाणे तिच्यावर चिडू नाही शकले. आज काल माहेर आणि सासर यातील रेषा फार धूसर होत आहे कारण सासू-सासरे सुनेला मुली सारखे वागवतात.पण तरीही आईशी भांडून नंतर तिला मारलेला मस्का,तिच्या कडे केलेले हट्ट, दर वाढ-दिवसाला तिने केलेले औक्षण आणि जगाला आपण कसेही दिसत असलो तरी तिने हजार वेळा आपल्याला नजर लागू नये म्हणून मायेने फिरवलेला हात. परीक्षेवेळी आपल्यासाठी बोललेले नवस असोत वा करडो शब्दांनी आपल्यामागे केलेले कौतुक.आज जाणवतंय कि लहानपणी आई रागावली नसती तर मी आयुष्यात जे काही आहे ते बनू शकले नसते. आई-बाबा खरच खूप वेगळे असतात.ते मुलांसाठी जे करतात ते कदाचित १००% समजणे फार कठीण असते.आज मनापासून असे वाटत आहे कि माझ्याकडून जे काही कटू शब्द माझ्याही न-कळत आई-बाबांना मनाला लागले असतील ते क्षण भरून निघावेत!
आज नव्या आयुष्याची स्वप्ने पाहताना एक पापणी सुखी संसाराची स्वप्न पाहतीय तर एक पाणावली आहे. आज मनात चालणाऱ्या या वादळाने मला बरेच काही उलगडून सांगितले आहे . चि.सौ.कां. या गोंडस नावाच्या टप्प्या पर्यंत येताना 'सौ' च्या अलीकडे असणाऱ्या आई-बाबांच्या 'चि.'मुलीने लाग्नाच्या पलीकडील सौभाग्याचे 'कान्क्षण' पूर्णत्वाला नेताना बरेच काही शिकायचे असते. आपल्या घरातील उंबरठा ओलांडताना आई-बाबांनी दिलेल्या प्रेमाची आणि संस्कारांची खूप प्रकर्षाने जाणीव होते. जे त्यांनी दिले त्याहून कित्तेक पटीने त्यांना आपण देणे लागतो याची मनाला जाणीव होते. कधी काळी दूर स्वप्नात रमलेल्या मनाला यातून नवीन शिकायला मिळते आणि आपण आता फक्त आई-बाबांची लाडकी मुलगी नसून नवीन आयुष्यात नवीन नात्यांशी जोडले जाणार आहोत या सत्याशी परत नव्याने ओळख होते...
लग्न पहावे करून! या उक्तीनुसार माहेरचे संस्कार घेऊन सासरी नवीन नात्यांना आपुलकीचा ओलावा आणि सुखाचे मोती देऊ इच्छीणाऱ्या मला-' चि.सौ.कां.' ला आज माझीच नव्याने ओळख होत आहे. आयुष्यातील या नवीन वाटेवर मला तुमच्या सदिच्छा नक्की द्या!